

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धन व विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांच्या संवर्धन, जीर्णोद्धार व विकास आराखड्यासह अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभिकरण आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची नियुक्ती झाली आहे.
साताऱ्यात संगम माहुली येथे महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधींचे संवर्धंन करून जीर्णोद्धार व्हावा यासाठी दै. ‘पुढारी’ने गेली कित्येक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कृतियुक्त प्रतिसाद दिला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे या समाधी स्थळांसह किल्ले अजिंक्यताऱ्याच्या सुशोभिकरणाचा आराखडा राज्य शासनाने तयार केला.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १४ जुलै २०२६ रोजी शुद्धीपत्रके जारी करून यापूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष असतील, या तरतुदीत बदल केला आहे. अगोदरच्या निर्णयानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई हे या समितीचे अध्यक्ष होते. आता राज्य शासनाने निर्णय बदलून नव्याने शुद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार या दोन्ही विकास आराखड्यांसाठी आता मंत्री शिवेंद्रराजे भोसले जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत.
कार्यकारी समिती पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार
संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांच्या संवर्धन व जीर्णोद्धारासाठी २९ जून २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. दोन्ही विकास आराखड्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समिती पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे.