

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा मुख्यमंत्री असताना सुटला नाही; पण देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला. आता हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे. सातारा गॅझेटियरचा प्रश्नही महिन्यात मार्गी लावू, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सातार्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचे शिवतीर्थावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर काही प्रश्न मार्गी लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बरोबरच सदस्य ना. शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील व इतरांच्या सहभागातून प्रश्न मार्गी लागले आहेत. सातारा गॅझेटियरबाबतही महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याची बैठक मंगळवारनंतर पुढील आठवड्यात होईल. सातारा गॅझेटियरनुसार मराठा व कुणबी एकच आहेत. त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता करून निर्णय घेतला जाईल. पुणे गॅझेटियर, औंध गॅझेटियर यावर लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.
मराठा मोर्चा असो किंवा त्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी असो, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कधीही आक्षेप घेतले नाहीत. मनोज जरांगे हे सातार्यात आले असताना आम्ही त्यांच्यासोबत होतो. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कधीही कुणाला टोकले नाही. त्यांनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. आंदोलन करत असताना मुंबईत सर्व आंदोलकांना त्रास झाला. मात्र, जीआर काढताना सर्व बाबी तपासून घेणे महत्त्वाचे होते. चार-पाच दिवसांत जीआर अंतिम झाला. त्यानंतर उपसमिती, कायदे तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर आरक्षण देण्यात आल्याचे ना. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर सरकारला काहींच्या रोषाला सामोरे जावे लागणार असले, तरी ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सातारा गॅझेटियर लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सातार्यात नागरी सत्कार
मराठा समाजात अनेक मुख्यमंत्री आणि मोठे नेते होऊन गेले. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असताना त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्न दुसर्यांदा मार्गी लावल्याचा पुनरुच्चार करून ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ब्राह्मण असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देतील का? आरक्षण प्रश्नाकडे ते कसे बघतील? असे प्रश्न केले जात होते. मात्र, त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून पूर्वी मराठा आरक्षण दिले होते. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण चॅलेंज झाले. पुढे मविआची सत्ता आल्यावर हे आरक्षण रद्द झाले, ही वस्तुस्थिती आहे. आताही त्यांच्याच नेतृत्वाखाली आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सातारा गॅझेटियर लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सातार्यात नागरी सत्कार घेण्यात येईल.