

सातारा : गेली अनेक वर्षे खड्ड्यांनी व अपूर्ण कामांनी घायकुतीला आलेल्या मुंबई - गोवा महामार्गासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची धावपळ सुरू आहे. गणेशोत्सवात कोकणची जनता या महामार्गावरून मुंबईतून कोकणात जात असते. या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी कोकणचे दैवत असलेल्या कोकणच्या ‘महाराजा’साठी सातारचा राजा धावाधाव करत असल्याचे चित्र कोकणच्या जनतेसाठी सुसह्य करणारे व नवा आशावाद घेऊन येणारे ठरत आहे.
मुंबई - गोवा महामार्गासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने सुरू आहेत. मराठी पत्रकार परिषद व कोकणच्या प्रत्येक भागातील सामाजिक कार्यकर्ते अनेकदा या आंदोलनात सक्रीय सहभागी झाले आहेत. अनेक मंत्री आले आणि गेले मात्र महामार्ग तसाच राहिला. खड्ड्यांनी, खाचखळग्यांनी व अर्धवट कामांनी घायकुतीला आलेल्या या महामार्गावरुन कोकणची जनता कित्येक वर्षे रडतखडत प्रवास करत असते. अनेक वर्षांचे हे दुखणे सोडवण्यासाठी दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीच पुढाकार घेतला आहे.
मंत्रीपद स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या दौर्याची सुरुवातच शिवेंद्रराजेंनी कोकणातून केली. मुंबई - गोवा महामार्गाची अधिकार्यांना घेवून त्यांनी पाहणी केली. 2026 च्या जानेवारीची डेडलाईनही त्यांनी दिली. एवढ्यावरच शिवेंद्रराजे थांबले नाहीत त्यांनी मंत्रालयस्तरावर या महामार्गासाठी अनेकदा बैठका घेतल्या. गणेशोत्सव तोंडावर असताना शिवेंद्रराजेंनी पुन्हा एकदा या महामार्गाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. अधिकार्यांची टीम सोबत घेवून गेले तीन दिवस शिवेंद्रराजे कोकणात आहेत. गणपती ही कोकणची देवता. कोकणी माणूस गणपतीला ‘महाराजा’ म्हणतो. मुंबईत चाकरी करण्यासाठी असलेला कोकणी माणूस हमखास गणपतीला गावी जातो. गावी जाताना प्रत्येक कोकणी माणूस मुंबई-गोवा महामार्गावरुन जात असतो. गेली अनेक वर्षे महामार्गावरुन जाणार्या कोकणी माणसाची अवस्था दयनीय होवून जाते. यावर्षी गणेशोत्सवात कोकणच्या जनतेचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी शिवेंद्रराजेंनी पुढाकार घेतला आहे. गेल्या तीन दिवसात त्यांनी अधिकार्यांची फौजच महामार्गावर उतरवली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी करुन किमान गणेशोत्सवाला जाताना आणि येताना कोकणच्या जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना शिवेंद्रराजेंनी दिल्या आहेत.
कोकणची जनता आपल्या महाराजा गणपतीबाप्पांच्या दर्शनासाठी कोकणात जाणार आहे. त्यामुळे या गणेशभक्तांचा प्रवास सुसह्य होण्यासाठी सातारचा राजा गेले तीन दिवस कोकणात धावत आहे. याबद्दल कोकणच्या जनतेलाही अप्रूफ वाटत आहे. शिवेंद्रराजेंनी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी अपेक्षा कोकणची जनता व्यक्त करत आहे.