

सातारा : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राज्यातील निडणुकांसाठी स्टार प्रचारकांची बुधवारी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत साताऱ्यातील नेते ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. जयकुमार गोरे यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी हाती घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या 40 हेविवेट नेत्यांवर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही भाजपने स्टार प्रचारकांची नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही भाजपने जोरदार तयारी केली आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मागील आठवड्यातच स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सातारा जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तर सोलापूर पूर्वची जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी माणचे नेते ना. जयकुमार गोरे यांच्यावर देण्यात आली होती. आता या दोन्ही नेत्यांवर पक्षाने स्टार प्रचारकाची नवी जबाबदारी दिली आहे. भाजपच्या जास्तीत-जास्त जागा निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.