

सातारा : सातारा जिल्हा परिषदेसाठी भाजपने स्वबळाची तयारी केल्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्येच खटके उडणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपला शह देण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे ना. शिवेंद्रराजेंनी पालकमंत्र्यांनी बोलावले तरच युतीवर चर्चा होईल, अशी भूमिका मांडली तर दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी बंद दाराआड खलबते झाली. यामध्ये भाजपला शह देण्यासाठी रणनीती आखण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे धूमशान सुरू झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी महायुतीविरोधात साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीला ना. मकरंद पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, खा. नितीन पाटील, माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीत सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्यावर चर्चा झाली. यामुळे जिल्ह्यातच महायुतीतच भडका उडणार असल्याचे स्पष्ट झाले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील कोयना दौलत या निवासस्थानी सायंकाळी बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षामध्ये जोर बैठकांना ऊत आला आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. राज्यात अनेक ठिकाणी महायुती फिस्कटली आहे. साताऱ्यातही तशीच चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपने स्वबळाची तयारी केली असल्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतीलच दोन पक्षांनी भाजप विरोधात एकत्र लढण्यासाठी पावले उचलल्याचे स्पष्ट झाले. भाजप शतप्रतिशतच्या नाऱ्याला छेद देण्यासाठी ही बैठक झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.