

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बेदखल केल्याने महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक त्वेषाने लढवली. भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यामध्ये या दोन्ही पक्षांना यश आले असले, तरी आता सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेतेमंडळींनी एकत्रित चाली खेळल्या. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेऊन बोलणी केली. भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.
भाजप नेत्यांनी वाई, फलटण, पाटण मतदारसंघामध्ये घुसखोरी करून आपल्यावर टीका केल्याचा राग राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे यांनी वाई, पाटण व फलटणमध्ये सभा घेऊन शिवसेनेचे नेते व विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेचे सत्र सरू ठेवले, तर पाटणमध्येही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. वाई मतदारसंघातही ना. मकरंद पाटील यांच्यावर टीका केली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी तर पाटणमध्ये ना. शंभूराज देसाई यांचा टांगा पलटी करण्याची भाषा वापरलीहोती.
मात्र, या तिन्ही मतदासंघामध्ये नेमके उलटे झाले. या परिस्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांबाबत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. तीच नाराजी कायम असून आता भाजपच्या नेत्यांसमोर चर्चा करायला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका ना. शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते ना. मकरंद पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये चर्चा झाली.
तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस खा. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनाही ना. शंभूराज देसाई यांनी गुरुवारी सोबत ठेवले. सत्तेच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल या दोन्ही पक्षांनी उचलले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुणाकडे?, उपाध्यक्षपद कुणाकडे? सभापतीपदांचे वाटप या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा या बैठकीत झाली असल्याने राष्ट्रवादी-शिवसेना मिळून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करणार आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील नूतन सदस्यांची बैठक साताऱ्यात होणार आहे. या बैठकीनंतर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित स्पष्ट होणार आहे.
भाजपच्या गोटात सन्नाटा
जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 27 सदस्य निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजपला 6 सदस्य आणखी लागणार आहेत. राष्ट्रवादी-शिवसेनेने 37 इतका बहुमताचा आकडा मिळवल्याचे या पक्षांच्या नेतेमंडळींनी जाहीरही करुन टाकले आहे. निकालानंतर भाजपचे जिल्ह्यातील वरिष्ठ दोन्ही नेते जिल्ह्याबाहेर गेले आहेत. तर भाजपच्या गोटामध्ये सन्नाटा पसरला आहे.