

शिरवळ : शिरवळ व पिसाळवाडीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोन्याच्या दुकानांसह 4 मेडिकल दुकाने फोडून सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच पिसाळवाडीच्या हद्दीतील नीरा नदीवर असलेली ग्रामपंचायतीची पाण्याची विद्युत मोटर, केबल व मच्छिमारीसाठी वापरण्यात येणारी बोट लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ ता.खंडाळा येथील मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेसमोर असणार्या दुकान गाळ्यातील एस. के. ज्वेलर्सचे दुकान फोडून चांदीचे दागिने व इतर साहित्य असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच मुख्य रस्त्यावर असलेली चारही मेडिकलची दुकाने फोडून किरकोळ रक्कम व इतर साहित्य लांबवले. त्याचबरोबर शिर्के कॉलनी येथील एका गॅस एजन्सीचे शटर उचकटून नुकसान केले आहे. तर पिसाळवाडी येथील नीरा नदीकाठी असणार्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत मोटार व केबल, इतर शेतकर्यांच्या मालकीच्या शेतातील मोटारीच्या केबल व नीरा नदीमध्ये मच्छिमारी व्यवसाय करण्याकरता भोळी येथील हरिश्चंद्र जाधव यांच्या मालकीची साधारण 60 हजार रुपये किमतीची बोट चोरटयांनी चोरून नेली आहे. दरम्यान, घटनास्थळी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळ पोलिस निरीक्षक संदिप जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शिद यांनी भेट देऊन पाहणी केली.