

शिखर शिंगणापूर : माण तालुक्याच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दिवसभर शिंगणापूर परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपासूनच थंडगार वारा, पावसाची रिपरिप अन् धुक्याची चादर असे वातावरण असल्याने शिखर शिंगणापूरला मिनी महाबळेश्वरचा फील आला आहे. मे महिन्यात पडणार्या संततधार पावसामुळे माणच्या दुष्काळी पट्ट्यात मोसमी पावसाचे वातावरण झाले आहे.
दरवर्षी मे महिन्यात माण तालुक्यातील जनतेला कडक उन्हाचे चटके सोसावे लागतात. यावर्षी मात्र माणच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. गेल्या आठवड्यापासून शिंगणापूरसह परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच शिंगणापूर परिसरात संततधार सुरु होती. शंभू महादेव मंदिर, मुंगीघाट डोंगर, उमाबन परिसरासह डोंगराळ भागात दाट धुके पसरले होते. नातेपुते, फलटण घाटरस्त्यावरही धुक्याची झालर पसरल्याने वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. डोंगरावर असलेले शंभू महादेवाचे मंदिर दिवसभर दाट धुक्यात हरवले होते. शिंगणापुरात येणारे भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासह पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत होते. दिवसभर सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे डोंगररांगेतून पाण्याचे लोट वाहत होते. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती, तर अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता.
दरवर्षी आषाढ, श्रावणात पडणार्या संततधार पावसाच्या सरी यावर्षी वैशाख वणव्यात अनुभवता येत असल्याने माणदेशी जनता सुखावली आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टँकरग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या पेरण्यासाठी योग्य वेळेत पाऊस होत असल्याने माण तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. दरम्यान अवकाळीच्या फटक्याने काही शेतकर्यांचे कांदा, भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे.