शेतकर्‍यांचे वास्तव साहित्यिकांनी मांडावे : शेट्टी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित मराठी साहित्य संमेलन
Raju Shetty |
कराड : बोलताना राजू शेट्टी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.Pudhari Photo
Published on
Updated on

कराड : शेतकर्‍यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे. साहित्यिकांनी लिखाण करताना पुरस्कारासाठी न करता समाजाच्या हितासाठी करून त्यावरील उपाय देखील त्यामध्ये सुचित करावेत. तरच साहित्य अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित मराठी साहित्य संमेलनात कृषक समाज काल आज आणि उद्या या विषयावरील परिसंवादात राजू शेट्टी यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, साहित्य परिषदेचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजेपवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन नाळे, राज्य उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे यांची उपस्थिती होती.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकर्‍यांपासून झाला आहे. भांडवलदाराने शेतकर्‍यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले. स्वामीनाथन, सुब्रमण्यम यांनी देशात हरितक्रांती आणली. शेतकर्‍यांनी समृद्धी आणली त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे चित्र योग्य पद्धतीने रंगवले नाही. गोरगरिबांचे शोषण करणारा, फेटा उडवणार अशा पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात व चित्रपटात रंगवले गेले. शेतकर्‍यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे.

उत्पादन खर्च प्रतिदिन वाढत आहे. या उलट शेतकर्‍याचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या असून दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शरद जोशी म्हणायचे सरकारचे धोरण हेच शेतकर्‍याचे मरण आहे. अस्मानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करत असताना सरकार सुलतानी संकट शेतकर्‍यांवर लादत आहे. बाजार पेठ व उत्पादित मालाची नेमकी माहिती सरकारकडून शेतकर्‍यांना दिली जात नाही त्यामुळे शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न कमी असेल तर सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. शेतीमालाच्या दरावर नियंत्रण करण्याचा कायदा सरकारने केला असला तरी शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. बाजारपेठेवर शेतकर्‍यांचे नियंत्रण नाही, तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध लादले जात आहेत. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याची अंमलबजावणी सरकारने करावी.

डॉ. शरद गोरे म्हणाले, या देशात शेतकर्‍याची मोठी पिळवणूक होत आहे. जात व धर्म ही व्यवस्था बोगस आहे. शेतकरी व बहुजन समाजाला दाबण्यासाठी प्रयत्न झाले. मराठी राजभाषा आहे. संस्कृत कधीही राजभाषा नव्हती. याचे कोणतेही संदर्भ साहित्यात आढळून येत नाहीत.

विठ्ठल राजेपवार म्हणाले, जोपर्यंत शेतकर्‍यांमध्ये राजकारण आहे तोपर्यंत त्यांना एकत्र येऊ दिले जाणार नाही. उत्पादन वाढवा म्हणून सांगणारे भरपूर आहेत पण शेतमालाला भाव द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्येला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. सत्तेसाठी वापर करून घेणार्‍या राजकारण्यांना बाजूला केले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने शेतकर्‍यांना सन्मानाने जगण्याचे अधिकार दिले. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी शेतकरी संघटनानी संघर्ष करण्याची गरज आहे. यावेळी साहित्यिक कवी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले. आभार विकास भोसले यांनी मांनले.

कवी व साहित्यिकांनी फुलून गेली साहित्य नगरी

साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातून आलेल्या 600 कवी व साहित्यिकांची मांदियाळी यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत पाहायला मिळाली. कवी संमेलन, कथाकथन परिसंवाद यासारख्या विविध विषयांचे मोठे विचार मंथन या विचारपीठावरून झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news