

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेमंडळी पहिल्यापासून इंडिया आघाडीच्या बैठकांना हजर राहत होते. खा. सुप्रियाताई सुळे याही कालपर्यंत बैठकीला उपस्थित होत्या. तसेच आजच्या बैठकीला झुमद्वारे त्या हजेरी लावणार होत्या, पण हे होण्याआधीच घाई लागलेले मित्रपक्षातील गल्लीतले नेते आरोप करण्याची घाई करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाले, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत होणाऱ्या चर्चांना आमच्या पक्षाचे नेते मित्रपक्षांसोबत कायम होते. पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे रुग्णालयात असल्याने दिल्लीतील इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला खा. सुप्रियाताई सुळे या झुम मिटिंगद्वारे हजेरी लावणार होत्या. पण हे होण्याआधीच सकाळपासून या विधेयकाला आम्ही समर्थन दिले, अशा चर्चा मित्रपक्षांतील नेत्यांनी सुरु केल्या आहेत.
या विधेयकाबाबत पक्षांतर्गत चर्चा करुन निर्णय घेवू, असे खा. सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले होते. मात्र, मित्रपक्षांनी आमच्यावर आरोप केल्याने पक्षाचे खासदार आणि नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकांना जावूच नये, अशी भूमिका व्यक्त करायला सुरुवात केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.