

सातारा : अजितदादा होते, तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिकरणावर चर्चा झाली होती. आता मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विलिनीकरणाचा विषय संपवला आहे. आता राज्यभर सक्षम विरोधक निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक आमदार, खासदारांनी याबाबत आपली मते मांडली आहेत.
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राभर जाऊन सरकारच्या अपयशाचा पाढा आता वाचणार आहोत, ज्यांना यायचे असेल त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येण्याची तयारी असेल तरच यावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
अजित पवार गटाच्या 22 आमदारांनी खा. शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती, याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, आमच्याकडे कुठल्याही पक्षाचा प्रस्ताव आलेला नाही. आमदार येत असतील आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येवून ते काम करणार असतील, तर त्यांच्या बाबतीत विचार करु. पक्षशिस्त व चौकटीत राहून काम करत राहू. एकत्रितपणे संघटना बांधून काम करण्याचे धोरण आम्ही हाती घेतले आहे.
खा. सुनिल तटकरे व खा. प्रफुल्ल पटेल यांनी खा. पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते दोघे आले होते. त्याचा राजकीय अर्थ कोणी लावू नये. एखादा नेता भेटायला आला तर कुठल्या कारणाने आला तर त्याला पार्टीचा अँगल देवू नका. याबाबत संभ्रमावस्था निर्माण करु नका, ही माझी माध्यमांना विनंती आहे. पवार साहेबांकडे येणारे नेते अनेक आहेत.
सरकारच्या अपयशाबाबत राज्यभर आवाज उठवण्यासाठी 15 ऑगस्टनंतर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नेते दौरे करणार आहेत. जनतेच्या प्रश्नांवर जनभावना निर्माण करायची. महाराष्ट्रात सरकारच्याविरोधात चित्र निर्माण करायचे, असे यामागचे संयुक्तिक धोरण ठरले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. अजित पवार यांच्याकडून येणाऱ्या आमदारांसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले राहणार का? असे विचारले असता शिंदे म्हणाले, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करतील, त्यांचा विचार केला जाईल.