

सातारा : महाविकास आघाडी आता फुटण्याच्या अवस्थेत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात अंतर्गत धुसफूस वाढली आहे. या गटाच्या राजकीय र्हासाला आता सुरुवात झाली असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सातार्यात केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत घडामोडी वाढल्या आहेत. काहीजणांचा अजित पवारांकडे जाण्याचा कल आहे तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. त्यातच आ. जितेंद्र आव्हाड व आ. रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून शरद पवार गटातील खासदार फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरूनही राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर शरसंधान साधले आहे. शुक्रवारी मंत्री शेलार सातार्यात आले तेव्हा माध्यमांनी या विषयावर त्यांना बोलते केले.
यावेळी ना. शेलार म्हणाले, मी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली असून ते फुटणार असल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणूक जागा वाटपासाठी एकमत केले होते. मात्र निकाल लागल्यानंतर ते फुटणार हे नक्की होते. मविआ नावाची गोष्ट आता अस्तित्वात नाही. त्यांची एक्सपायरी डेट झाली आहे. मविआ फक्त सत्तेसाठी एकत्र आले ते आता एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. राज्याच्या विकासाचा व मविआचा संबंध नव्हताच. शरद पवार यांच्या गटात अंतर्गत कलहाचे प्रकार घडत आहेत हे नैसर्गिक आहे. त्यांच्या राजकीय र्हासाला आता सुरुवात झाली असल्याची टीकाही ना. आशिष शेलार यांनी केली.