

सातारा : जिल्ह्यात सध्या 68 टँकरने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी योजनांच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांमुळे गतवर्षीच्या तुलनेत टँकर संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. मात्र, टँकरची मागणी असेल त्या वाडी-वस्तीला प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता यांनी त्वरीत भेट देऊन तीन दिवसांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पाणी टंचाई व जलजीवन मिशनच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर खा. नितीन पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरूण नाईक, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात गेल्यावर्षी 268 टँकर सुरू होते. त्या तुलनेत यावर्षी फक्त 68 टँकर सुरू आहेत. मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 42.37 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी या दिवसापर्यंत 40.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी निम्म्याहून कमी टँकरची संख्या झाली आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या उपाययोजना तसेच पाणी योजनांच्या कामांचे हे यश आहे. महिन्याच्या कालावधीत ज्या वाडी-वस्तीतून टँकरची मागणी होईल, त्याठिकाणी त्वरीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही ना. शंभूराज देसाई यांनी दिली. ना. जयकुमार गोरे यांनी टँकरसाठीच्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून टंचाईग्रस्त गाावांतील उपसा सिंचन योजनांची विद्युत देयके टंचाई निवारण निधीतून भरण्यात यावीत, अशी सूचना केली. टंचाई आढावा बैठकप्रसंगी ना. शंभूराज देसाई, खा. नितीन पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील व इतर.