Shambhuraj Desai: आम्ही निवडणुकीपुरते नाही तर कायम जनतेत
सणबूर : कितीही मोठी राजकीय ताकद उभी करा, कितीही चेहरे मैदानात उतरवा; मंद्रूळकोळे जिल्हा परिषद मतदारसंघावर आमचेच वर्चस्व राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. ढेबेवाडी विभागावर माझे पूर्ण लक्ष आहे. कोण येतोय, किती ताकद लावतोय, याची आम्हाला जराही भीती नाही. आम्ही निवडणुकीपुरते नव्हे, तर कायम जनतेत आहोत, अशा शब्दांत ना. देसाई यांनी विरोधकांना आव्हान दिले.
मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे ग्रामीण रस्ते विकास 3054 अंतर्गत सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ना. देसाई बोलत होते. पाटण विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी ढेबेवाडी विभाग हा निर्णायक असून, या विभागातूनच विजयाची लढाई जिंकली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ना. देसाई म्हणाले, मंत्रिमंडळातील माझे सहकारी इथे प्रचाराला आले तरी काही फरक पडणार नाही. जनतेचा विश्वास प्रचारातून नाही, तर कामातून मिळतो. पूर असो, अतिवृष्टी असो, दरडी कोसळणे असो, रस्ते बंद होणे असो किंवा कोरोना महामारी प्रत्येक संकटात कोण जनतेच्या पाठीशी ठाम उभं राहिलं हे लोकांनी अनुभवलं आहे. निवडणुकीपुरते पुढे येणारे आणि संकटात गायब होणारे चेहरे जनता पूर्णपणे ओळखते.
पाटण मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणून प्रत्येक वाडीवस्तीचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच पाटणची जनता पाठीशी खंबीरपणे उभी रहात आहे. भविष्यातही ही जनता साथ देईल यात शंका नाही. विरोधकांच्या भुलथापांना जनतेने बळी पडू नये. यावेळी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सागर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमास कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास गोडांबे, संचालक ज्योतीराज काळे, माजी पं. स. सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी, दिलीपराव जानुगडे,मनोज मोहित, रणजित पाटील, प्रकाश पवार, आदर्श सरपंच रविंद्र माने, मनोज पाटील, आत्माराम पाचुपते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. सुरेश पाटील, रोहित चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. रवींद्र ऊर्फ राजू रोडे यांनी स्वागत, तर रणजित पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

