

मेढा : जावली तालुक्याने 1995 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिला शिवसेनेचा आमदार निवडून आणत इतिहास घडवला आहे. तालुक्यातील मातीत आजही शिवसेना रुजलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे येथील स्वाभिमानी शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील मेळाव्यात बोलताना दिला. कुणी आमचा स्वाभिमान दुखवणार असेल तर शिवसेना स्वबळावर लढेल, असेही त्यांनी ठणकावले.
मेढा येथे शिवसेनेचा मेळावा व जावलीचे सुपुत्र, नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांचा नागरी सत्कार कार्यक्रमात पालकमंत्री देसाई बोलत होते. व्यासपीठावर अंकुश बाबा कदम, मुख्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख रणजित भोसले, उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, तालुका प्रमुख समीर गोळे, प्रशांत तरडे, शांताराम कदम, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे, सचिन करंजेकर, सुधीर करंदकर, प्रशांत जुनघरे, सचिन शेलार, गणेश निकम, अमरदीप तरडे आदी उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीमध्ये आमचाही पक्ष आहे. पण आमचाही कुणी स्वाभिमान दुखवणार असेल व महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचार केला गेला नाही तर स्वबळावर संपूर्ण ताकदीनिशी लढून मेढा नगरपंचायत व पंचायत समितीवर माझे शिवसैनिक भगवा झेंडा फडकवतील. तो फडकवण्यासाठी मी सर्वतोपरी ताकद शिवसैनिकांना या पुढील काळात देईन. त्यामुळे न थांबता आता शिवसैनिकांनो कामाला लागा, अशा सूचना देसाई यांनी यावेळी दिल्या.
अंकुश बाबा कदम यांनी तालुक्यातील रोजगार व इतर मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत जावलीतील नागरिकांचा स्वाभिमान जागा केला. सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जे-जे काम घेऊन गेलो, ते-ते काम त्यांनी मार्गी लावले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकसंघपणे व ताकदीने या निवडणुका शिवसैनिकांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे.