

सातारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे जिथे शेती पिकांचे, पशुधनाचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे पाऊस उघडताच गतीने सुरु करा. या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहू देऊ नका, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. दरम्यान, मान्सून कालावधीत अधिकार्यांनी फिल्डवर जावून काम करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. मान्सून कालावधीत अति पावसामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास संपर्क पुन्हा प्रस्थापित करुन देण्याची खबरदारी घ्या. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले आहे. ज्या गावांचे स्थलांतर करण्याबाबत सांगितले आहे, त्या गावांच्या स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा.
दुर्गम भागामध्ये राहणार्या नागरिकांना पावसाळ्यात पडणार्या दरडींना सामोरे जावे लागते. विशेषत: सातारा, जावली, वाई, पाटण या भागातील जे लोक डोंगराशेजारी राहतात, त्यांच्या घरांना दरडींचा धोका वाढतो. अनेकदा दरडी पडून या लोकांचेच नुकसान झाले आहे, त्यामुळे कुठलीही दुर्दैवी घटना घडण्याआधी दरड प्रवण गावांमधील नागरिकांची राहण्याची सोय करा, अशा सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी या बैठकीत केल्या.
ज्या गावांवर डोंगरातील दरडी पडत असतील तर अशा गावांमध्ये डोंगराच्या कडेला बांबू लागवड करावी. बांबूमुळे दरडी पडण्याचे प्रमाण खूप कमी असते. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले असून आवश्यकतेप्रमाणे पुन्हा या गावांचे सर्व्हेक्षण करावे, अशा सूचना ना. मकरंद पाटील यांनी केल्या.