

सातारा : जिल्हा परिषद सभापती निवड प्रक्रियेवर सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार घातला. झेडपीच्या इतिहासात प्रथमच सभापती निवडीवेळी काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावे लागले. सेना-राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सदस्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खा. नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, संजीवराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब सोळस्कर, अनिल देसाई, संजय देसाई, सुरेंद्र गुदगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. शंभूराज देसाई म्हणाले, सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सर्व झेडपी सदस्यांची मते जाणून घेतली. अध्यक्ष-उपाध्यक्षनिवडीवेळी घडल्या प्रकाराबाबत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. बळाचा व सत्तेचा गैरवापर करून झालेली ही निवड गाजली. अशा वातावरणात भाजपासोबत आम्हाला निवडणूक लढवायची नसून आमचा या निवड प्रक्रियेला तीव्र विरोध आहे. या निवडणूक प्रक्रियेत आम्ही सहभाग घेऊ इच्छित नाही. सोबत असलेल्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
आमचे सर्व सदस्य काळ्या फिती लावून झेडपीत गेले. सभागृहात त्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच काळ्या फिती लावून सदस्यांना पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे लागले. जिल्हा परिषदेत कामकाज करताना जिल्ह्याच्या विकासावर आमचे सदस्य आवाज उठवतील. आमच्या एका जरी सदस्यावर अन्याय झाला तर त्या सदस्यामागे आमच्यासह सर्व सदस्य ताकदीने उभे राहतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीचे निरोप शिपायांकडून देण्यात आल्याने गेलो नसल्याचे भाजपचे मंत्री सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, या बैठकीचे निरोप पालकमंत्री कार्यालयातून अधिकृतरित्या देण्यात आले होते. कुणाच्या स्वीय सहायकाकडे, कुणाच्या कुठल्या व्यक्तीजवळ निरोप दिला त्याच्या माझ्याकडे नोंदी आहेत. शिपायाकडे किंवा आमच्या शिपायाने असा निरोप दिलेला नाही, असे ना. शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले.