

कराड : पुढारी वृत्तसेवा
स्वर्गीय आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात शंका होती. काही तासानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काही तासात अचानक त्यांचा मृत्यू झाला. आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाठ यांनी जी शंका उपस्थित केली आहे ते पाहता यात शंका घ्यायला वाव आहे, असे मत व्यक्त करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या दाव्यास एक प्रकारे समर्थन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभापूर्वी पत्रकारांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही जोरदार टीका केली. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे प्रेशरखाली असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांचीच लोक म्हणायला लागली असून, यावर आम्ही काय बोलणार ? आमदार भास्करराव जाधव यांना अनुभव आला असावा. महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांचे प्रेशर सहकारी पक्षांवर होते. महायुती सोडून चुकीच्या लोकांची संगत धरल्याने उद्धव ठाकरे यांना आता कोणाच्या तरी प्रेशरखाली राहावे लागत आहे.
दुसऱ्याला प्रेशर देणारे नेतृत्व शिवसेनेचे असते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी स्वतःकडे नेतृत्व ठेवले आणि त्यांना जे हवे होते ते त्यांनी महायुतीत करून घेतले होते. पण आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे कोणाच्यातरी प्रेशर खाली राहतात आणि कोणाच्यातरी प्रेशर खाली वागतात हे त्यांचे सहकारी बोलत आहेत. त्यामुळे याचा विचार आता त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभेला लोक जमत नाहीत. तेच जितेंद्र आव्हाड आज आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय व्यक्तिमत्व पाहिल्यास आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास एक स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नेहमीच त्यांच्या सभांना गर्दी होते आणि आजही त्यांच्या सभांना गर्दी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे वाटून लोकांना सभेला आणण्याची वेळ कधीही येणार नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि केवळ अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.