

कराड : चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासक असताना पालकमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासनाने काम केलेले आहे. मी पालकमंत्री असल्यामुळे राजेंद्रसिंह यादव यांना भरपूर फायदा झाला. ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी माझ्याकडून भरपूर निधी घेऊन कराडमध्ये विकासकामे केलेली आहेत. यापुढेही कराड साठी भरपूर निधी दिला जाणार आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकशाही व यशवंत आघाडीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.
कराडच्या शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टच्यावतीने राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शनिवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक अल्ताफभाई शिकलगार, विजयसिंह यादव, अख्तर आंबेकरी, नगरसेविका मिनाज पटवेकर, रजिया आंबेकरी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टचे ट्रस्टी हाजी मजहरभाई कागदी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, माजी जि. प. सदस्य बशीरभाई खोंदू, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, माजी नगरसेवक फारूख पटवेकर, ट्रस्टचे अध्यक्ष हाजी जैनुद्दीन भादी, सचिव इसाहक सवार, तसेच ट्रस्टी हाजी मुनीर बागवान, हाजी बरकत पटवेकर, मज्जीद आंबेकर, साबिरमियाँ मुल्ला व खैय्याम मुल्ला आदींची उपस्थिती होती.
ना. शंभूराज देसाई म्हणाले. कराड मधील विकास कामाबाबत पुढील आठवड्यात नगरपालिकेत बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये कराड शहराच्या पुढील पाच वर्षाचा रोड मॅप तयार करणार आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की राष्ट्रावर व देशावर प्रेम करणारा मुस्लिम हा शिवसेनेचा आहे. मुस्लिम समाजासाठी भरीव काम करणार असून समाजाने याबाबतचा प्रस्ताव द्यावा त्यांना सहकार्य केले जाईल. राजेंद्रसिंह यादव यांच्या यशामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे. राजेंद्रसिंह यादव हे कराडकर मतदारांचे आश्वासने पूर्ण करतीलच सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे केबिन नेहमीच उघडे असेल.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडमधील शाश्वत विकास आणि विचार घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. आणि या जनतेने आम्हाला स्वीकारले. नगर पालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. कराड शहरातील मुस्लिम समाजासाठी आम्हाला चांगले काही शाश्वत असे भरीव असे काम करायचे आहे. ते काम समाजातील लोकांनी सुचवावे ते आम्ही नक्की करून दाखवू. कराड नगर पालिकेचे व्यासपीठ हे सर्व सामन्याचे हक्काचे व्यासपीठ आहे.
हाजी मजहरभाई कागदी म्हणाले, मुस्लिम समाज हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले जीवदान, बलिदान देणारा एक घटक आहे. जयंतकाका पाटील म्हणाले, आपल्याला नगर पालिकेत जे यश मिळाले त्यामध्ये मुस्लिम समाजाचा खूप मोलाचा वाटा आहे. यावेळी सूत्रसंचालन नईम कागदी यांनी केले तर आभार साबीरमिया मुल्ला यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.