Shambhuraj Desai : पोलिसांनी मला फरफटत नेले

शंभूराज देसाईंचे विधानसभेत आक्रंदन : एसपींसह पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडत असताना पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने मोगलाईप्रमाणे भूमिका बजावली आहे. पोलिसांनी मला फरफटत नेले, अजून अंग दुखत आहे. आम्ही मंत्री, आमदारही सभागृहात सुरक्षित नाही, अशी परिस्थिती आहे. विधीमंडळानेच आम्हाला आता संरक्षण द्यावे. न्या. रामशास्त्री प्रभुणे यांच्या न्यायदानाच्या बाण्याने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

साताऱ्याच्या जिल्हा परिषदेतील झालेल्या राड्याच्या अनुषंगाने ना. देसाई यांनी विधान परिषदेसह विधानसभेमध्ये आपबिती सांगितली. ना. देसाई म्हणाले, पोलिसांनी मला ओढले तर ना. मकरंद पाटील यांचे बंधू खा. नितीन पाटील यांना ढकलून पायऱ्यांवरुन खाली पाडले. ना. मकरंद पाटील यांनाही खाली ढकलून दिले. साध्या वेषातील 100 पोलिस यासाठी कामाला लावले होते. आपल्या राज्यात मोगलाई लागली आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत. आम्ही 4 लाख लोकांकडून निवडून आलो आहोत. या गोंधळात माझ्या बोटाला काय लागले? ते कळाले नाही. माझ्या शर्टवर तसेच माझ्या सोबत असलेल्या संदीप मांडवे या जिल्हा परिषद सदस्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पडले. माझ्या बॉडिगार्डने त्याचा रुमाल माझ्या बोटाला बांधायला दिला, तोवर आमचे दोन्ही सदस्य पोलिसांनी फरफटत नेले.

मेटल डिटेक्टर पाच फुटावर होते. तिथून दोन सदस्यांना ओढून नेले. त्यांना मतदान करु दिले नाही. आतमध्ये भाजपचे 50 कार्यकर्ते होते आणि मी स्वत:, ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. शशिकांत शिंदे आम्ही चौघेच या ठिकाणी होतो. शिवसेना, राष्ट्रवादीचे 10 कार्यकर्ते येवून दिले पाहिजे होते. पण तसे होवू दिले नाही. सभापतींनी आम्हाला न्याय द्यावा. साताऱ्याचे एसपी घरगड्यासारखे वागले आहेत. त्याला सेवेतून बडतर्फ करा, निवृत्त न्यायाधीशामार्फत त्याची चौकशी करा. एसपी तुषार दोशी यांच्यासोबतच एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलिस यांना तत्काळ निलंबित करा. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिले आहे. सातारा जिल्हा परिषदेतील 20 तारखेच्या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अर्जाद्वारे मागितले आहे. ते डिलिट किंवा एडिट केले जावू शकते, याचीही भीती असल्याने याबाबत शासनाच्यावतीने तत्काळ आदेश देण्यात यावेत.

ना. देसाई पुढे म्हणाले, मी जे भोगले आहे. हात जोडून विनंती करतो. माझे म्हणणे गांभीर्याने ऐकून घ्या. आम्ही मंत्री नंतर आम्ही मानव आहोत. आमचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. आ. हेमंत पाटील, आ. विक्रम काळे यांनी 20 तारखेच्या घटनेची माहिती दिली आहे. मी पक्षाचा उपनेता आहे. जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या सदस्यांना व्हीप बजावायचा अधिकार प्रतोद या नात्याने मला दिला गेला असल्यानेच मी जिल्हा परिषदेत गेलो होतो. या सदस्यांना मला व्हीप बजवायचा होता, माझ्या वकिलालाही पोलिसांनी सोबत घेवू दिले नाही. मला एकट्याला जायला सांगितले. नियमाने पक्षाने मला अधिकार दिला होता, म्हणून गेलो.

राज्याच्या इतिहासात पोलिस अशा पद्धतीने मारहाण करत असतील, तर बोलायचे नाही का? प्रा. राम शिंदे यांच्याकडे रामशास्त्री बाणा आहे, त्यांच्याकडेच आम्ही न्याय मागणार आहोत. आम्हाला आपणच संरक्षण द्यावे. एसपी तुषार दोशी याच्या मागील कारभाराची चौकशी करावी. आंतरवली सराटीत जो प्रकार झाला. तो याच एसपीच्या काळात झाला होता. रेल्वे पोलिसमधून कोणाला साताऱ्यात आणून बसवला. सीसीटीव्ही फुटेजमधील साध्या वेषातील पोलिस यांना मला हे कर्मचारी दाखवले तर आम्ही ओळखू. आमचा आक्षेप चुकीचे वागणाऱ्या पोलिसांवर आहे, असेही ना. देसाई यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news