Shaktipith highway: शक्तिपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार

शासनाकडून सुधारित आखणी : माण-खटावमधून येऊन सांगली जिल्ह्यात जाणार
Shaktipith highway
Shaktipith highwayPudhari
Published on
Updated on

सातारा : शक्तिपीठ महामार्गामध्ये यापूर्वी सातारा जिल्ह्याचा समावेश नव्हता. मात्र, महामार्गाची सुधारित आखणी करून शासनाने सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यांचा समावेश या महामार्गात केला आहे. सोलापूर जिल्ह्यातून येऊन माण-खटावमार्गे हा महामार्ग सांगली जिल्ह्यात जाईल. नव्या आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आला.

राज्य शासनाने नागपूर - गोवा शीघसंचार द्रुतगती महामार्गाच्या (शक्तिपीठ महामार्ग) रेखांकनाला 7 एप्रिल 2024 रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणाऱ्या 802.59 कि.मी. लांबीच्या या महामार्गाच्या आखणीस मान्यता देण्यात आली होती. मात्र या प्रस्तावित महामार्गाला विविध ठिकाणी, विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात विरोध झाला.

यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीची भूसंपादनाची अधिसूचना 15 ऑक्टोबर 2024 रोजी रद्द करण्यात आली. यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाशी संबधित लोकप्रतिनिधी, मंत्र्यांशी चर्चा करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला.

13 जिल्हे; 40 तालुक्यातून जाणार महामार्ग

नव्या रेखाकंनानुसार शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतून, 40 तालुक्यांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आदींसह 21 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील 18 तासांचा प्रवास साधारणतः 8 तासावर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news