

सातारा : गावोगावी स्वच्छतेसंबंधी जनजागृती करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेमध्येच गटारगंगा उघड्यावर आली आहे. मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
गावोगावी कचरा व स्वच्छतेबाबत जिल्हा परिषदेमार्फत उपदेशाचे ढोस ग्रामपंचायतींना दिले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुख्य इमारत व विस्तारीत इमारतीच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात मैलामिश्रित सांडपाणी वाहत आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. याबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला कल्पना दिली होती. मात्र कोणतीही कार्यवाही या विभागाकडून होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची डबकी तयार झाली आहेत. दूषित सांडपाण्यामुळे माशा व डासांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांना या परिसरातून जाता येता तोंडाला रुमाल लावूनच जावे लागत आहे. या सांडपाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. जिल्हा परिषद परिसरातील सांडपाण्यामुळे नागरिकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांना गंभीर आजार झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने वेळीच कार्यवाही करावी, अशी मागणीही होत आहे.