

दहिवडी : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या बहुतांशी व्यक्ती या जिल्हा परिषद शाळेतच शिकल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेतच पाठवा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकांना केले.
माण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा आंधळी येथे शाळा प्रवेशोत्सव मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कार्यकारी अभियंता अमर नलवडे, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, अर्जुन काळे, डी. एस. काळे, संतोष काळे उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, शाळेत प्रवेश घेणं हा पालकांच्या तसेच त्या मुलांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. शाळा चांगली चालावी, शाळेत सर्वोत्तम शिक्षण मिळावं यासाठी शासन कटिबद्ध आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य जसे गणवेश, पुस्तकं, बुट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मातृभाषेतून शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण असते. त्यामुळे मुलं इंग्लिश मिडीयमला घालू नका. जिल्हा परिषद शाळेत पहिलीपासूनच चांगले इंग्रजीचं शिक्षण मिळेल याची खात्री बाळगा, असेही ते म्हणाले.