

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर – पाचगणी रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यानुसार या मार्गावरील अतिक्रमण केलेल्या 65 जणांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर अतिक्रमणधारकांनी शनिवारपासून स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. जे लोक अतिक्रमणे काढणार नाही ती प्रशासनाकडून हटवण्यात येणार आहेत.
महाबळेश्वर-पाचगणी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सर्व विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत रस्त्याच्या मध्यापासून 10 मीटर अंतरावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार 65 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. स्वत:हून अतिक्रमणे काढण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला काही अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी प्रतिसाद देत शनिवारी स्वत:हून अतिक्रमण काढले आहे. वेण्णालेक -लिंगमळा तसेच मेटगुताड सह मुख्य रस्त्यावरील अनेक अतिक्रमणधारकांनी जाहिरात फलकासह संरक्षक भिंती, टपर्या, तार कुंपण, शेड अशी अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. जी अतिक्रमणे निघणार नाहीत अशी अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटवण्यात येणार आहेत.