

नायगाव : महाराष्ट्रावर खर्याअर्थाने महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जे उपकार आहेत ते कधीही विसरू शकत नाही. ना. एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी नायगावमध्ये येऊन स्मारक करण्याची घोषणा केली. याचा आराखडा तयार झाला असून त्याचे सादरीकरण केले आहे. पाच वर्षांनंतर सावित्रीमाईंची द्विशताब्दी सुरू होईल. त्यापूर्वी येथील स्मारक तयार असेल. यासाठी जिल्हाधिकार्यांनी 10 एकर जमिनीचे अधिग्रहण करावे. स्मारकासाठी सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, मंत्री ना. अतुल सावे, माजी मंत्री आ. छगन भुजबळ, ना. पंकजा मुंडे, ना. शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. आदिती तटकरे, ना. जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील, आ. डॉ. अतुल भोसले, आ.मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, आ. महादेव जानकर, डॉ.प्रिया महेश शिंदे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार मदनदादा भोसले, नरेंद्र पाटील, सुरभी भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, प्रकाश बोंबले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंंंत्री फडणवीस म्हणाले, नायगावच्या मातीने मला उर्जा दिली. सरपंचांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी जयाभाऊंची आहे, हे मी त्यांना सांगणारच होतो. तोवर आ. जयकुमार गोरे यांनी पुढच्या कार्यक्रमात या मागण्या कराव्या लागणार नसल्याचे सांगितले. गेल्या काही काळामध्ये दुर्दैवाने इतके महत्वाचे व पवित्र स्थान दुर्लक्षित राहिले. आ. छगन भुजबळ यांनी या ठिकाणाची प्रेरणा ओळखून कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला. आता या कामासाठी कोणतीच अडचण राहिले नाही. कारण आता जिल्ह्याला चार-चार मंत्री मिळालेले आहेत. यामुळे इथल्या विकासाला अडचण येणार नाही. या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही.
सावित्रीमाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यवाही वेगाने केली जाणार आहे. भिडेवाड्याचा प्रश्न मिटला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी जो समतेचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालत समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होईपर्यंत कार्यरत राहू, अशी ग्वाही ना. फडणवीस यांनी दिली.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाचा मंत्री म्हणून येथे येण्याचे भाग्य लाभले. सावित्रीमाईंचा जन्म झाला नसता तर माता-भगिनींना आणखी किती कालखंड सोसावा लागता असता. सावित्रीमाईंचा विचार आ. छगन भुजबळ यांनी देशात पोहचवण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकास मंत्री म्हणून नायगाव दत्तक घेईन. येथून पुढे नायगावमधून एकही तक्रार येणार नाही. सरपंचांना सांगितले होते की यापुढे एकही निवेदन देवू देणार नाही. सावित्रीमाईंची भूमी ही प्रेरणास्त्रोत असून भव्यदिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी होती. ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मी ही मागणी केली होती. येथे 10 एकर जागा सरकारने खरेदी करून भव्य स्मारक उभारावे. काही गोष्टी घडण्यासाठी योग यावा लागतो. तुमच्याच हातून त्या गोष्टी घडायच्या होत्या त्यामुळेच या गोष्टी राहिल्या आहेत. स्मारकासाठी 125 कोटी लागतात. हा संकल्प आपल्या माध्यमातून पूर्ण होईल. हा स्मारक आराखडा मंजूर करावा. दोन वर्षाच्या आत हे स्मारक उभारावे. आपण दिलेल्या संधीचे सोने करू, असेही ना. गोरे म्हणाले.
ना. मकरंद पाटील म्हणाले, ज्या गावात क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा जन्म झाला, त्या गावाचे मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले आहे. अज्ञानातून समाजाला पुढे आणण्याचे काम फुले दाम्पत्याने केले आहे. यामुळे खर्या अर्थाने समाजाला दिशा मिळाली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या पुढे आहेत. याचे सर्व श्रेय सावित्रीमाई फुले यांनाच जाते. क्रांतीज्योतींनी देशाला दिशा देण्याचे काम केले. आ. छगन भुजबळ यांच्यासह मंत्र्यांनी नायगावच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. स्मारक परिसराचा विकास आराखडा 100 कोटींचा असून या आराखड्याला मान्यता द्यावी. नायगाव हे शैक्षणिक व सांस्कृतिक हब व्हावे, अशी मागणी ना. मकरंद पाटील यांनी केली.
आ. छगन भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास मुख्यमंत्री आल्याने कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आहे. स्व. हरी नरके यांनी सावित्रीमाईंचे जन्मघर मला दाखवले. त्यानंतर या जन्मस्थळाचा विकास करण्यास सुरुवात झाली. सावित्रीमाईंचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. फुल्यांना विरोध करणारे जसे ब्राम्हण होते तसेच मदत करणारेही ब्राम्हणच होते. पुण्यात तब्बल 36 वर्षानंतर महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. पुण्यातील भिडेवाड्याच्या कामात ना. चंद्रकांतदादांनी व मुख्यमंत्र्यांनी चांगली मदत केली. नायगांवमध्ये मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करावे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार 3 जानेवारीला नायगांवमध्ये देण्यात यावा, अशी मागणीही आ. भुजबळ यांनी केली. सरपंच स्वाती जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, धैर्यशील कदम, बाळासाहेब सोळस्कर, अरुण गोरे, मनोज पवार, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र तांबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.