

सातारा : नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रस्तावित विकास कामांना गती मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांंच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तत्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली होती. मंत्री जयकुमार गोरे यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.