

पाटण : सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. मंगळवार, 10 जूनला ते मुंंबईत प्रदेश कार्यालयात होणार्या कार्यक्रमात भाजपामध्ये जाणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सातारा जिल्ह्यात भाजपाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्यजितसिंह पाटणकर यांच्या रूपाने देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात असून, पाटणकर यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यासह पाटणच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र असलेले सत्यजितसिंह पाटणकर यांना मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाटण विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडला होता. महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत सत्यजितसिंह पाटणकर यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून सत्यजितसिंह पाटणकर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सत्यजितसिंह पाटणकर यांचे मागील काही दशकांपासून पाटण पंचायत समितीसह विविध संस्थांवर वर्चस्व राहिले आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चेहराच राहिलेला नसून शरद पवार गट बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा जबर राजकीय धक्का मानला जात असून याचे पाटणसह जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघावर सन 2014 पासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे. पाटणकर घराणे हे मंत्री शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न या घडामोडीच्या माध्यमातून भाजपाकडून होत असल्याची चर्चा आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपाकडे एकही मजबूत राजकीय चेहरा नव्हता आणि त्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद खूपच कमी होती. मात्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निर्णयामुळे भाजपा मजबूत होणार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.