सातारच्या मांघरचा राजधानी दिल्लीत गोडवा

लाल किल्ल्यातील प्रदर्शनात मधाच्या चित्ररथाचा समावेश; राज्याचाही अनोखा सन्मान
सातारच्या मांघरचा राजधानी दिल्लीत गोडवा
File Photo
Published on
Updated on
प्रेषित गांधी

महाबळेश्वर : प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणार्‍या भारतपर्वमधील प्रदर्शनात मधाचे गाव या संकल्पनेचा गोडवा दिसणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा मान मिळाला होता. आता हे गाव दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनात लाल किल्ल्यावर होणार्‍या प्रदर्शनात झळकणार आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणार्‍या भारतपर्वमधील प्रदर्शनात महाराष्ट्राच्या चित्ररथात मधाचे गाव असणार्‍या मांघरचा समावेश करण्यात आला आहे. रोटेशननुसार ज्या राज्यांच्या चित्ररथाला कर्तव्यपथावरील संचलनात संधी मिळत नाही अशा राज्यातील चित्ररथ लाल किल्ल्यात भरणार्‍या भारत पर्व या प्रदर्शनात समाविष्ट असतात. त्यानुसार मांघरच्या मधाचा गोडवा राजधानी दिल्लीतील या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा मान मिळाला होता. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 1.25 लाख किलो मधाचे उत्पादन होते. त्यातील सुमारे 35,000 किलो मधाचे उत्पादन महाबळेश्वर व आसपासच्या भागात केले जाते. महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे निसर्गाचे वरदान लाभलेले गाव आहे. हे गाव आदर्श गाव असून स्मार्ट व्हिलेज असलेल्या मांघरने निमर्लग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, पयार्वरण विकास रत्न पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार व लोकग्राम पुरस्कार, असे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 16 मे 2022 मध्ये मांघरला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मान मिळाला. मांघर गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते.

गावातील प्रत्येक घरात मधपाळ असून सातारा जिल्ह्यातील एकूण मधाच्या उत्पादना पैकी दहा टक्केउत्पादन या गावात होते. मधाचे गाव मांघर येथे प्रारंभी गावातील लोकांना प्रशिक्षण दिले गेले. यानंतर त्यांना मधपेट्या देण्यात आल्या. वन विभागाच्या सहाय्याने मधमाशी पूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली. गावात मधमाशीचे मधुबन, माहिती दालन, प्रचार प्रसिद्धी विक्री केंद्र उभे राहिले आहे. गावातील उपयोगी नसलेल्या शाळेच्या इमारतीत प्रशिक्षण केंद्र व माहिती दालन देखील आहे. राज्यातील या पहिल्याच मधाच्या गावाला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन वर्षांमध्ये लाखो पर्यटकांनी या गावाला भेट दिली. सातारा जिल्हाधिकार्‍यांनी देखील भरघोस निधी या गावाला उपलब्ध करून दिल्याने मधाच्या गावात लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. मधाची विक्री करून लोकांना जास्तीचे पैसे मिळत आहेत. गावात सेंद्रिय शेती सुरु झाली आहे. आज गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलली असून गावाला मध पर्यटन दर्जा प्राप्त झाला आहे.

मधाचे गाव निर्मितीसाठी ना. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली. तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, संचालक रघुनाथ नारायणकार यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरवर्षी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या चित्ररथाचे संचलन करण्यात येते. यंदा रोटेशनमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला कर्तव्यपथावर संधी नाही. मात्र, लाल किल्ल्यातील भारत पर्व प्रदर्शनात मांघरचा समावेश असलेला चित्ररथ दिसणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालय राज्यांना विषय सुचवत असते. यावर्षी महाराष्ट्रासाठी ‘मधाचे गाव’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या निर्मितीसाठी 60 लाख रुपये खर्चास राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली आहे.

त्याशिवाय पूर्वतयारी व इतर खर्चासाठी 11 लाख 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. मधाच्या गावात मधमाशी पालन, मध संकलन ते मध विक्रीपर्यंतचा प्रवास लोकांना पाहता येतो व आपल्या समोरच मधमाशीचा शुद्ध मध देखील खरेदी करता येतो. ‘मधाचे गाव’ ही छोटी संकल्पना आता देशाच्या राजधानीत मोठ्या दिमाखात दिसणार आहे. निसर्गातील हा अनमोल कीटक वाचावा या साठी सुरु केलेला हा छोटासा प्रयत्न देशपातळीवर जातो हे निश्चितच समाधान देणारे आहे.

मांघर गावास देशातील पहिले मधाचे गाव होण्याचा मान मिळाला. आता देशाची राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनात मधाचे गाव या संकल्पनेवर आधारित चित्ररथ दिसणार आहे. ही बाब आम्हा मांघरवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
गणेश जाधव, सरपंच मांघर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news