

सातारा : दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने समाज कल्याण अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वतः दिव्यांग बांधवांची समजूत काढत त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबले. दरम्यान, शासनाकडून मिळत असलेली अडीच हजार रुपये पेन्शन प्रत्यक्षात हातात दीड हजारच मिळत असल्याचे गाऱ्हाणे आंदोलकांनी मांडले.
प्रहार संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्यावतीने दिव्यांगांच्या अनेक शासकीय मागण्यांच्या संदर्भाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे. मात्र दर वेळेला त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, असा दिव्यांगांनी आरोप केला. दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगळे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गाडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश मोकल, प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र पाटील यांच्यासह दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखत सातारा-कोरेगाव रस्त्यावर ठिय्या मारला. दिव्यांग बांधवांनी पोलिसांच्या पायावर पडून ‘आमच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा आम्ही इथून हटणार नाही,’ अशी भूमिका घेतली.
दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये पेन्शन मंजूर होऊनही अनेक दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये मिळत आहेत. सर्व तहसीलदारांना याबाबतचे तातडीचे आदेश देण्यात यावेत, अशी आग्रही भूमिका दिव्यांग बांधवांनी घेतली. सुमारे अर्धा तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.