

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात बुधवारी दुपारी बिर्याणीचा सुगंध दरवळल्याने पार्टी बहाद्दरांची कमालच दिसून आली.
बाहेर धो धो पावसाने जनतेची तारांबळ उडाली असताना टीपीत आत कर्मचार्यांची व अधिकार्यांची पातेले घेवून पळापळ सुरु होती. त्यामुळे पार्टी करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांमधून होत आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारताच्या पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग व सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचे कार्यालय आहे. त्यामुळे या कार्यालयात नेहमीच नागरिकांची कामानिमित्त वर्दळ असते.
बुधवारीही कार्यालयात नेहमीप्रमाणे नागरिकांची गर्दी होती. तसेच पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नागरिकही कार्यालयात बराच वेळ बसून होते. मात्र दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भर पावसात एक अलिशान गाडी पाणी व स्वच्छता कार्यालयाच्या समोर आली. त्यावेळी अलिशान गाडीतून एक नागरिक उतरला. त्या अलिशान वाहनातून बिर्याणीचे पातेले काढून त्याने तडक पहिल्या मजल्यावर असलेल्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर एका दालनात तो कर्मचारी बिर्याणीचे पातेले ठेवून बाहेर आला. त्यानंतर एक कर्मचारी पत्रावळ्या, ग्लास, द्रोण व अन्य साहित्य घेवून गेला.
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागातील सर्वच कर्मचार्यांना बिर्याणी देण्यात आल्याने झेडपीच्या विस्तारीत इमारत परिसरात बिर्याणीचा खमंग दरवळू लागला. बाहेर पाऊस सुरू असताना कार्यालयात मात्र अधिकारी व कर्मचार्यांनी बिर्याणीवर चांगलाच ताव मारला. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी बिर्याणी पार्टीत व्यस्त असताना कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली. या कार्यालयात वारंवार पार्ट्या झोडल्या जात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. भर कामाच्या वेळेत जर पार्ट्यांचे नियोजन कार्यालयात होत असेल तर नागरिकांची कामे वेळेत होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेवून संबंधित पार्टी झोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई केली पाहीजे.
जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात कार्यरत असणार्या 4 ते 5 कर्मचार्यांची बदली होणार आहे. त्यामुळे या कर्मचार्यांनी सामूहिक बिर्याणीची पार्टी दिली असल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात रंगली होती. महाबळेश्वरमधील एकाने या पार्टीचे सर्व नियोजन केले होते, असेही बोलण्यात आले.