

सातारा : पोवईनाका ते बॉम्बे रेस्टाॅरंट मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टाॅरंट मार्ग हा वर्दळीचा आहे. या मार्गावर जिल्हाधिकारी, पंचायत समिती, एलआयसी ऑफीस, कोर्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा बँक यासह अन्य शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांसह नागरिकांची वर्दळ असते. त्यातच या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.
मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस व ट्रॅाफीक वॉर्डन मदत करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने रस्त्याचे काम दिवसा न करता रात्रीच्या वेळी केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही.