Satara ZP Elections: जि.प., पं.स. रणांगणातून कोण-कोण काढणार पळ?

बंडखोरी थोपवण्यासाठी प्रयत्न : पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार
Local body elections
Satara ZP ElectionPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी 632, तर 11 पंचायत समित्यांच्या 130 जागांसाठी 1 हजार 59 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच पक्षांतील डावललेल्या इच्छुक व नाराजांनी ईर्षेने पेटून निवडणूक लढवायची असा चंगच बांधला आहे; मात्र अर्ज माघार घेण्यास आता सुरुवात झाली असून सर्वच नाराज डावललेले उमेदवार लढणार की निवडणुकीच्या रणांगणातून पळ काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नाराजांची समजूत काढताना नेते व पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत.

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धामधूम सुरू होती. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. डावललेल्या उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळल्यामुळेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये बंडखोरीची उकळी फुटली.

ए.बी.फॉर्म न दिल्याने अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. ज्या इच्छुकांनी ए.बी.फॉर्मची अपेक्षा केली होती. त्यांना डावलले गेल्यानंतर आता बघतोच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसमोर बंडखोरी केलेल्या उमेदवारांना थोपवण्याचे आव्हान असणार आहे. त्यातच भाजपा, राष्ट्रवादीसह इतर पक्षामधील अनेक उमेदवारांनी तिकीट न मिळाल्याने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली तर अनेकांना ए.बी. फॉर्म न दिल्याने पदाधिकाऱ्यांची गोची झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वच प्रमुख पक्षांना बसला आहे तर अनेक तालुक्यांमध्ये खिंडारही पडले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाली. यामध्ये अनेक अर्ज बाद झाले.

मात्र आता अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. 27 जानेवारी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष माघार घेणाऱ्या उमेदवारांकडे लागून राहिले आहे. शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समितीचे 130 गणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. छाननीच्या दिवशीच बंडखोरांमधील बहुतांश उमेदवारांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची निवडणूक लढवायचीच या इर्षेने पेटले आहेत. गट व गणात अर्जाचा विचार करता सर्वच प्रमुख पक्षाचे उमेदवार जास्त असल्याचे चित्र गट व गणामध्ये पहावयास मिळत आहे. मुळातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लोकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. तसेच आपला पक्ष आपल्याला तिकीट देणार का? याची चाचपणीही संबंधित इच्छुकांकडून होत होती. तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर काहींनी दुसऱ्या पक्षातून तिकिट मिळवण्याचे प्रयत्न केले होते.

अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेशही केला होता. यामधील अनेक जणांना तिकीटाची लॉटरीही लागली आहे. याचा परिपाक म्हणून निष्ठावंत आणि इच्छुकांमध्ये बंडाळी झाली. या सर्व प्रकारामुळे पक्षातून डावललेल्यांना शांत कसे करायचे? असा प्रश्न नेत्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे आतापासूनच नेते व पदाधिकारी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये आपल्याच पक्षातील उमेदवाराने बंडाळी केल्याने अधिकृत उमेदवारांना धोका असल्यास विविध पदे व प्रलोभने दाखवून माघार घेण्यास दबाव टाकला जाण्याची दाट शक्यता आहे. पदांची ऑफर दिल्यानंतर काही जण माघार घेतील. परंतू इर्षेने पेटलेल्या उमेदवारांना कसे शांत बसवावे? ही डोकेदुखी ठरणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षाचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. त्यामुळे आता रणांगणातून कोण कोण पळ काढणार? हे पहावे लागणार आहे.

नेत्यांची होणार दमछाक...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 691 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये बंडाळी केलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पक्षविरोधात असलेल्या नाराजीमुळे आता निवडणूक लढवायचीच अशी भूमिका अनेकांनी घेतल्याने किती जण माघार घेणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार सेफ करण्यासाठी नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांना पायाला भिंगरी लावावी लागणार असून त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news