

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील पदोन्नती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. शासनाचा 150 दिवसांचा कार्यक्रम संपत आला असला तरी कर्मचार्यांवर अन्याय होत आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच कर्मचार्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले आहे.
सातारा जिल्हा परिषद मधील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक मधून वरीष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक मधून कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नत्या दोन वर्षापासून रखडवून ठेवल्या आहेत. कनिष्ठ सहाय्यक मधून वरीष्ठ सहाय्यक 31 जागा, कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदाच्या 14 जागा आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदाच्या 3 जागा सध्या रिक्त आहेत. या जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असताना जाणीवपुर्वक त्या पदांचे प्रमोशन करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेली नाही.
इतर सर्व संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया होवून सुद्धा जो विभाग सर्व संवर्गाचे प्रमोशन करण्याची कार्यवाही पूर्ण करतो त्याच विभागातील विविध संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया का केली जात नाही? हा संशोधनाचा विषय झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या कोर्ट केस किंवा इतर तक्रारीमुळे रखडलेली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांची पदोन्नत्या केल्या. मात्र त्यांना सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक मधून वरीष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक मधून कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची प्रमोशन करणे काही अवघड नाही. त्यासाठी नको ती कारणे सांगून त्या पदांचे प्रमोशन होवू नये यासाठी पडद्या मागून कोणीतरी सूत्रे हलवीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.
प्रमोशन प्रक्रिया राबवण्यात यावी याबाबत सेवा ज्येष्ठता यादी मधील कर्मचार्यांनी जि. प. प्रशासनाला विनंती अर्ज करून काही महिन्यांचा कालावधी झाला असला तरी त्यावर प्रशासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे काही संघटनांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना रखडलेल्या पदोन्नतीबाबत निवेदन दिले होते. ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनामार्फत काहीही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या सूचनेलाच प्रशासन टाळत असेल तर अन्य कर्मचारी व नागरिकांच्या अर्जावर प्रशासन काय कार्यवाही करणार? असा प्रश्न कर्मचार्यांना पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी कर्मचार्यांमधून होत आहे.
झेडपी प्रशासनावर कर्मचार्यांची नाराजी...
सामान्य प्रशासन विभागाने गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडवली आहे. याबाबत कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी काहीही कार्यवाही होत नाही. पदोन्नतीसाठी पात्र असूनही पदोन्नती होत नसेल तर कर्मचार्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. झेडपीतील सामान्य प्रशासन विभागामधील पदोन्नती प्रक्रिया पार पडत नसेल तर हे अपयश कोणाचे ? असा प्रश्न आता कर्मचार्यांना पडला आहे.