Satara Politics : झेडपी निवडीचे अधिवेशनात उमटणार पडसाद

ना. एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक : राज्याचे लक्ष
Eknath Shinde
एकनाथ शिंदेFile Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या नाट्यमय व रक्तरंजित राजकीय घडामोडींमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई नंदनवन येथील मलबार हिल आमदार निवासात ही बैठक होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हा महायूती म्हणून एकत्र सत्तेत आहेत. मात्र राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतील या घटक पक्षांनीच एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करून दंड थोपटले. त्यानंतर काही ठिकाणी युती करून सत्ता स्थापन केली तर काही ठिकाणी सत्तेसाठी टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्या.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत महायुतीतील पक्षांमधील टोकाचा संघर्ष राज्याने पाहिला. सातारा जि.प. मध्ये भाजपचे 27, राष्ट्रवादी 20, शिवसेना 15, काँग्रेस 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी 33 ची मॅजिक फिगर आवश्यक होती. त्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्रित येऊन आपले सदस्य अज्ञातस्थळी सुमारे महिनाभर ठेवले होते. प्रत्यक्ष निवडीवेळी रक्तरंजित थरार झाला. राष्ट्रवादीच्या दोन जि.प. सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मतदानासाठी हे दोघे सदस्य येताच पोलिसांनी त्यांना उचलले. त्यामुळे अध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या बाजूने 33 तर विरोधी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या बाजूने 30 मते पडली. परिणामी, झेडपीवर भाजपने 33 विरुद्ध 30 अशा फरकाने झेंडा फडकवला. यावेळी प्रचंड धुमसाधुमशी, धराधरी झाली. शाब्दिक बाचाबाची व टोकाचा संघर्ष झाला. तणातणीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे बोट रक्तबंबाळ झाले. ना. देसाई, ना. मकरंद पाटील या महायुतीतील मंत्र्यांनीच भाजपवर निशाणा साधत लोकशाहीचा खून केल्याची टीका केली तर भाजपच्या ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्र्यांनीच दांडगाई करून उच्छाद मांडल्याची टीका केली. या सर्व रक्तरंजित घडामोडींनी राज्याचे लक्ष वेधले.

या संपूर्ण घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. सोमवारी शिवसेना आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीत झेडपी अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषतः स्थानिक पातळीवरील नाराजी आणि पक्षनिष्ठा यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: साताऱ्यातील घटनेमुळे सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातील या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news