

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 11 पंचायत समितींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
2022 मध्ये झालेल्या नव्या रचनेनुसार या निवडणुका होणार की पूर्वीच्याच रचनेनुसार त्या घेतल्या जाणार, हेच अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जि.प. चे गट व पं.स. गणांच्या रचनेबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम असून इच्छुकांमध्येही गोंधळ आहे, तरीही निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांना उकळ्या फुटल्या असून त्यांच्या तयारीला वेग लागणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यावर मार्च 2022 मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेपासूनच इतिहासात प्रथमच सलग 3 वर्षे सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांवर प्रशासक राजवट आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व गट व गणांमध्ये निवडणुकीचे वारे संचारले असून इच्छुकांना गुदगुल्या सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2022 मध्ये केलेल्या रचनेनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 वरुन 73 तर पंचायत समितीची सदस्य संख्या 128 वरुन146 केली होती. त्यामुळे गट आणि गणात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. गट आणि गणाची आरक्षण सोडतही झाली होती. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडतही त्यावेळी काढली होती. मात्र सत्तांतरानंतर गट आणि गणाची जुनीच रचना राहिल असे महायुती सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे नव्या गट व गण रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या की जुन्यानुसार तसेच ओबीसी आरक्षणाचे नेमके काय होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. निवडणुका लागण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पुन्हा व्यूहरचनेला सुरुवात केली आहे. नव्या की जुन्या रचनेनुसार या निवडणुका होणार, हे ज्या त्या वेळी ठरवू. मात्र, आता लढायची तयारी ठेवायची, असा पवित्रा इच्छुकांनी घेतला आहे.