सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता नो एन्ट्री देण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यामध्ये कामासंदर्भात येण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यासह अन्य वरिष्ठांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. अन्यथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनामार्फत उगारण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामासंदर्भात किंवा अडचणीबाबत प्रथम शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची भेट घेणे आवश्यक आहे. मात्र काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे परस्पर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची परस्पर भेट घेत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कामासंदर्भात किंवा अडचणीबाबत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची प्रथम भेट घेवून संबंधितांच्या अडचणीचे कोणत्याही प्रकारचे निराकरण न झाल्यास जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणे आवश्यक असल्यास भेट घेता येईल. मात्र विनाकारण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आवारात कोणतीही परवानगी न घेता वावरताना आढळल्यास संबंधित शिक्षकांवर प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.