सातारा : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाची कामे करण्यासाठी शासनाला भरावयाची सुरक्षा रक्कम न भरता आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला असून, जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना काळ्या यादीत टाकले आहे.
मे २०२६ या कालावधीत लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात पाझर तलावांची विविध कामे करण्यात येणार होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये शिंदेवाडी ता. फलटण येथील योगेश रविंद्र बर्गे व संभाजीनगर एमआयडीसी सातारा येथील विजय बापूसाहेब घाडगे या दोन्ही ठेकेदारांनी वेगवेगळ्या कामांसाठी कमी निविदा सादर केल्याने त्यांना कामे मंजूर झाली. कामाच्या मंजुरीबाबत शासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सुरक्षा ठेवसह इतर शासकीय प्रक्रिया म्हणून दोन्ही ठेकेदारांनी अनामत रक्कम भरून त्याचे चलन झेडपीला जमा केले.
ठेकेदाराकडून आलेल्या चलनाबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी अरूणकुमार दिलपाक यांनी खातरजमा केली. चलनावर बँकेचा रिसिव्हड शिक्का बनावट व बँक कॅशिअरची सही खोटी असल्याचे निदर्शनास आले. तसेच संबंधित चलन बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बाब दिलपाक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम तसेच जिल्हा बँकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सिईओ यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिलपाक यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुमारे २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने योगेश बर्गे, विजय घाडगे या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे या दोन्ही ठेकेदारांना कोणत्याही विभागातील शासकीय कामे घेता येणार नाहीत. तसेच टेंडरही भरता येणार नाही. प्रशासनाच्या या कारवाईमुळे ठेकेदारामध्ये एकच खळबळ उडाली आहे.