

सातारा : ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा पाया घालण्यात सातारा जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मे 1962 मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून पार्ले, ता. कराड येथील यशवंत बाबूराव पाटील उर्फ आबासाहेब पार्लेकर यांनी काम पाहिले आणि त्यांच्या नेतृत्वातून जिल्हा परिषद प्रशासनाला भक्कम दिशा मिळाली. कार्यालयात फक्त दोन तास बसून उर्वरित वेळी जिल्हाभर फिरून नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. त्याचा एक आराखडा तयार करून ग्रामीण भागात विकासाला त्यांनी गती दिली. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नावलौकिक मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यांच्या या वाटचालीचे आजही राजकीय पटलावर स्मरण आहे.
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी होती. ग्रामीण भागाचा विकास स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व्हावा, लोकसहभाग वाढावा आणि प्रशासन गावपातळीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने जिल्हा परिषद व पंचायत समिती व्यवस्था सुरू करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यासह अन्य जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. शासनाने महाराष्ट्रामध्ये प्रयोग म्हणून सर्वांगीण मानवी विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदांची स्थापना केली. त्यावेळी आबासाहेब पार्लेकर निवडणुकीत निवडून आले आणि सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान त्यांनी मिळवला. यामागे स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता.
आबासाहेब पार्लेकर यांनी 12 ऑगस्ट 1962 ते 11 ऑगस्ट 1967 असा अध्यक्ष म्हणून कार्यकाल पाहिला. त्यांच्या जोडीला उपाध्यक्ष म्हणून नांदगावचे बाबूराव घोरपडे, मरळीचे भागवतराव देसाई, उडतारेचे साहेबराव पवार, चोरेचे बाबासाहेब चोरेकर, रेठरे बुद्रकचे यशवंतराव मोहिते, कार्वेचे आत्माराम जाधव, कापिलचे भाऊसाहेब जाधव, कुंभारगावचे बाबूराव चव्हाण, तारळ्याचे श्रीरंग जाधव या दिग्गजांसह 64 सदस्यांची फळी त्यांच्याबरोबर कार्यरत होती. आबासाहेब पार्लेकर यांनी केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते.
अध्यक्षपदानंतर रोज सकाळी 2 तास ते कार्यालयात थांबू लागले. त्यानंतर जिल्हाभर फिरून लोकांच्या अडी अडचणी काय आहेत, त्या समजून घेतल्या. लोकात मिसळून प्रश्नांचा शोध घेतला. जिल्हा परिषदेला असणारे हक्क आणि अधिकार व जनतेच्या अडचणींचा सखोल असा आराखडा तयार केला. सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कामानिमित्त सहीसाठी कागदपत्रे घेवून तेव्हा डोळे झाकून सही करणार असा विश्वास त्यांनी अधिकाऱ्यांवर दाखवला. मात्र, त्या विश्वासास पात्र असणे ही तुमची जबाबदारी आहे. मला फसवण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर त्याला प्रायश्चित भोगावे लागेल. मी शिक्षणात कमी असलो तरी कायदा आणि व्यवहारज्ञान याची फार मोठी शिदोरी सुदैवाने माझ्याकडे असल्याची तंबी ते देत असायचे.
आबासाहेब ज्या गावी जात तिथे प्रथम शाळेला ते भेट देत होते. तसेच शेती विषयक धोरण राबवताना पाचवड, गोंदवले, नागठाणे, औंड येथे जनावरांची शिबीरे भरावयास सुरूवात केली. प्रयोगादाखल जिल्हा परिषदेची नुकतीच सुरूवात असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी जागा आणि इमारत यांचा अभावच होता. सध्याच्या पंचायत समितीच्या ऑफीसमध्ये जिल्हा परिषदेचे कार्यालय होते. जागा कमी पडत असल्याने ते तीन ठिकाणी विभागून होते. आबांनी सखोल विचार करत स्वतंत्र इमारतीसाठी प्रयत्न केले. जिल्हा लोकल बोर्डाचा शिल्लक फंड व जिल्हा परिषदेची रक्कम 22 लाख रूपये जमा केले आणि इमारतीच्या कामकाजाला प्रारंभ केला.
आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषदेची भव्य इमारत आजही दिमाखात उभी आहे. जिल्हा परिषद स्थापन होताना सातारा जिल्ह्यात 11 पंचायत समित्या आणि हजारो ग्रामपंचायती कार्यरत होत्या. या सर्व संस्थांना एकत्रित करून ग्रामीण विकासाची दिशा ठरवणे हे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत आबासाहेब पार्लेकर यांनी पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि नव्याने उभ्या राहत असलेल्या स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला स्थैर्य दिले.