Satara ZP: हा तर ट्रेलर; पिक्चर अभी बाकी है..!

पहिल्याच सभेत आगामी कळवंडीची पेरणी : सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची लागणार कसोटी
Satara ZP
Satara ZP
Published on
Updated on
प्रविण शिंगटे

सातारा : तब्बल ४ वर्षानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आगामी काळातील कळवंडींची पेरणीच या सभेत झाली. हमरी-तुमरी, तणातणी यावरूनच पुढच्या पाच वर्षात काय होणार याचा ट्रेलर विरोधकांनी दाखवला. हा ट्रेलर असला तरी पिक्‍चर अभी बाकी है मेरे दोस्‍त, असेच म्‍हणावे लागणार आहे.

सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहूमत असल्याने सावध पावले टाकत त्‍यांना कारभार हाकावा लागणार आहे. विरोधकही फक्‍त टेबल न वाजवता अभ्यासपूर्ण आवाज उठवत असल्याने सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची आगामी काळात चांगलीच कसोटी लागणार असल्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे या प्रशासकीय राजवटीत मनमानी कारभार झाला. प्रत्येक विभागातील अधिकारी ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे जिल्हा परिषदेत कारभार करताना दिसत होते. प्रशासकीय राजवट असल्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना हे अधिकारी जुमानत नव्हते. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यामध्ये महायुतीला काठावरील बहुमत मिळाले.

सत्तेच्या जोरावर भाजपाने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. सभेपूर्वी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधीमंडळात सातार्‍यात सर्व अलबेल असून आम्‍ही दोघे भाऊ-भाऊ असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. मात्र, यानंतर दोनच दिवसांपूर्वी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. पहिल्‍या सभेसाठी सत्ताधार्‍यांनी आवश्‍यक ती पूर्व तयारी केली होती. मात्र, सभेच्‍या अजेंड्यावरील प्रत्‍येक विषयावर विरोधकांनी आवाज उठवून आपला इरादा स्पष्ट केला. अनेक विषयांना जोरदार विरोधही दर्शवला. पहिल्‍याच सभेत खडाजंगी झाल्‍याने अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत.

पहिल्‍याच सभेत जागा हस्‍तांतरणासह विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे सत्ताधार्‍यांना आवाजी मतदानाने विषय मंजूर करण्‍याची वेळ आली. सभेला सुरूवात झाल्यापासूनच आरोग्य , शिक्षण, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, महिला बालकल्याण, लघु पाटबंधारे, बांधकाम, कृषि विभागाच्या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक झाले.

विरोधक परिपूर्ण अभ्यास करूनच सभागृहात विविध मुद्यावर मांडणी करताना दिसत होते. मात्र सभागृहातील जुने व अनुभवी सदस्य ज्या विषयावर वाद होत होते त्या ठिकाणी मेळ घालताना दिसत होते. भाजपाचे सदस्यही तोडीस तोड उत्तरे देत असले तरी विरोधी शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य एकीतून उत्तरे देत होते. एका महिला सदस्याने सभागृहात फलक दाखवल्यानंतर जुन्या सदस्यांनी ही काय सभागृहाची प्रथा आहे का? जे सभागृहात गोंधळ करत आहेत त्यांना बाहेर काढा, अशी मागणी ज्येष्ठ सदस्यांनी केल्यानंतर विरोधी गटाच्या महिला सदस्य आक्रमक झाल्या. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्‍याच्‍या पातळीवर जरी महायुती म्‍हणून भाजप, राष्‍ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र असले तरी सातार्‍यात मात्र आगामी काळात जिल्‍हा परिषदेत महायुतीमध्येच तणातणी होणार हे पहिल्‍याच सभेत दिसून आले.

यासाठी सत्ताधार्‍यांना सावध कारभार करावा लागणार आहे. अन्‍यथा एक-एका विषयावर विरोधक न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावण्‍यास तयार आहेत. ही सभा तब्‍बल ५ तास चालली. प्रत्‍येक विषयावर काथ्‍याकूट झाला. सदस्‍यांच्‍या गोंधळातच एक विषय तहकूब करत इतर विषयांना मंजूरी देण्‍यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news