Satara ZP: विधान परिषदेत दै.‘पुढारी’चा हवाला देत लक्षवेधी

सातारा झेडपीतील बोगस चलनांवर चर्चा; मंत्र्यांकडून तपासणीचे आदेश
Satara ZP
Satara ZP: विधान परिषदेत दै.‘पुढारी’चा हवाला देत लक्षवेधी
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात बोगस चलने दाखवून ठेकेदारांनी सातारा झेडपीची तब्‍बल ३६ लाखांची फसवणूक करून घोटाळा केल्‍याचे दै. ‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्‍हाही दाखल झाला. हा विषय शुक्रवारी विधान परिषदेत गाजला. आ. राजेंद्र राऊत यांनी या विषयावर लक्षवेधी मांडून दै.‘पुढारी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा हवाला देत फसवणूक करणार्‍या ठेकेदारांवर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून सर्व चलनांची तपासणी करण्याचे आदेश दिले.

माण व खटाव तालुक्‍यांतील पाझर तलावांच्‍या कामांमध्‍ये कमी दराने टेंडर भरून आणि चलनांद्वारे सातारा जिल्‍हा परिषदेची काही ठेकेदारांकडून फसवणूक झाल्‍याचे दै. ‘पुढारी’ने उघड केले होते. त्यामुळे जिल्‍हा परिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर गुन्‍हा दाखल केला आहे. यावर शुक्रवारी विधान परिषदेत आ. राजेंद्र राऊत यांनी लक्षवेधी मांडली. फसवणूक करणार्‍या ठेकेदारांना कधी अटक करणार? असा सवालही केला.

यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्‍हणाले, हे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर जिल्‍हा परिषदेने संबंधित ठेकेदारांवर गुन्‍हा दाखल केला आहे. ४ चलनांचा तपास केला तेव्हा ११ निविदांमध्ये चलने बोगस दिल्‍याचे आढळून आले. गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. हा विषय फक्‍त दोन ठेकेदारांपुरता नाही. जिल्हा परिषदेमध्ये आजपर्यंत सुरक्षा ठेवीबाबत किती चलने बोगस आली, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक गुन्हे शाखा व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून याची चौकशी केली जाणार आहे. यामध्‍ये जे दोषी असतील त्‍यांच्‍यावर कारवाई केली जाणार आहे. फौजदारी गुन्‍हा दाखल झालेले संबंधित ठेकेदार पसार असून त्‍यांचा शोध सुरू असल्‍याचेही ना. गोरे यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news