Satara News | झेडपीसाठी मातब्बरांची किस्ताक बांधून व्यूहरचना

जुन्या की नव्या रचनेनुसार निवडणुका?; जिल्ह्यात संभ्रम : प्रमुख राजकीय पक्षांपुढे आव्हान
Satara News |
Satara News | झेडपीसाठी मातब्बरांची किस्ताक बांधून व्यूहरचनाFile Photo
Published on
Updated on

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील गट व गणामधील वातावरण पुरते ढवळून गेले आहे. सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष किस्ताक बांधून व्यूहरचनेला लागले आहेत. असे असले तरी संभाव्य निवडणुका गट व गणांच्या नव्या की जुन्या रचनेनुसार होणार? याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

बदललेले राजकीय संदर्भ, महायुतीची वाढलेली ताकद, महाविकास आघाडीची झालेली पडझड, जिल्हा परिषदेवर कायम वर्चस्व ठेवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झेंडा फडकवणे मातब्बर राजकीय पक्षांना आव्हानात्मक ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यामुळे या निवडणुका दृष्टिक्षेपात आल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांमध्ये गलबला उडाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कार्यकाल संपून सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. म्हणजेच सुमारे आठ वर्षांनंतर झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. सातारा जिल्ह्यात 64 गट व 128 गण होते. 2022 मध्ये झालेल्या गट व गणांच्या पुनर्रचनेत ही संख्या वाढली. त्यानुसार सातारा जिल्ह्यात 64 ऐवजी 73 गट व 128 गणांऐवजी 146 गण झाले.

त्यानुसार गट व गणांची आरक्षण सोडतही झाली होती. एवढेच काय झेडपीच्या अध्यक्षपदाची सोडतही काढण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गट व गणांची जुनी रचनाच कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत येत्या काळात अधिकृत स्पष्टीकरण होईलही. तूर्त सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

आतापर्यंत सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. गतवेळच्या झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित)41, काँग्रेस 7, भाजप 6, शिवसेना 2, सातारा विकास आघाडी 3, कराड विकास आघाडी 3, पाटण विकास आघाडी 1 असे बलाबल राहिले होते. तर 11 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 76, काँग्रेस 16, भाजप 10, शिवसेना 7, सातारा विकास आघाडी 7, पाटण विकास आघाडी 2, कराड विकास आघाडी 7, रासप 1, अपक्ष 2 असे बलाबल होते.

सद्य स्थितीचा विचार करता राजकीय गणिते बदलून गेली आहेत. पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा हा बालेकिल्ला पुरता उद्ध्वस्त होवून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा जिल्ह्यावर झेंडा फडकला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगत वाढवणारी ठरणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत त्यांच्याकडे प्रवेश करणार्‍यांचा कल वाढला आहे. शरद पवार गटाच्या काही माजी जि.प. व पं. स. सदस्यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. भाजपची जिल्ह्यात वाढलेली ताकद त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी उर्जा देणारी आहे. महायुती म्हणून भाजप, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांची झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत कशी मोट बांधली जाणार? यावर महायुतीचे यशापयश अवलंबून राहणार आहे. महाविकास आघाडीत सध्यातरी निरूत्साहाचे वातावरण आहे.

कार्यकर्त्यांची विस्कळीत झालेली घडी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. असे असले तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणता पक्ष काय भूमिका घेणार?, महायुती व महाविकास आघाडी किती एकजीव राहणार?, अंतर्गत फाटाफूट कोण कशी रोखणार?, नेत्यांची भूमिका कार्यकर्ते व मतदार किती स्वीकारणार? यावर त्या-त्या वेळचे राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. सध्या तरी इच्छुकांनी किस्ताक बांधून आखाड्यात उतरण्याची भूमिका घेतली आहे. पक्षांची वाढलेली संख्या अनेकांना पर्याय वाटू लागली आहे. त्यामुळे आता माघार नाही, हाच अजेंडा राबवत अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news