

सातारा : सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात रणधुमाळी माजली आहे. जिल्हा परिषदेच्या 65 जागा आणि अकरा पंचायत समित्यांच्या 130 जागांसाठी राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत रेकॉर्ड ब्रेक उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी, पक्षीय सस्पेन्स, अपक्षांची गर्दी आणि नाराज कार्यकर्त्यांचा संताप यामुळे राजकीय वातावरण तापले. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्याने अधिकृत आकडेवारी समोर आली नाही; मात्र 65 गट व 130 गणांत मिळून हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत रेकॉर्डब्रेक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरूवारी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशपत्रांची छाननी सुरू होणार आहे. यातून अनेक अपात्र अर्ज बाद होण्याची शक्यता असली तरी अर्ज छाननीपूर्वीच राजकीय पक्षांतील अंतर्गत बंडखोरी उघडपणे समोर आली.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवार सकाळपासून पक्ष कार्यालये, नेत्यांची घरे आणि संपर्क कार्यालयांभोवती चकरा मारत होते. आज ए-बी फॉर्म मिळणार, लवकरच नाव जाहीर करणार, वरून फोन येतोय, अशा बतावण्यांनी इच्छुक व कार्यकर्त्यांनी चार दिवस काढले. शेवटच्या दिवशीही नेत्यांकडून थापा सुरूच होत्या. नेत्यांनी अखेरपर्यंत उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायम ठेवत ऐन वेळेपर्यंत तिकीट वाटप जाहीर कले नाही. परिणामी, अनेक इच्छुक उमेदवारांनी ए व बी फॉर्म मिळो अगर ना मिळो, या मानसिकतेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करताना काही ठिकाणी नवे चेहरे दिले असले तरी बहुतांश ठिकाणी पुन्हा घराणेशाही, ओळखी, नातेसंबंध आणि आर्थिक ताकद असणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. निवडणुकीच्या प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता हवा, मात्र उमेदवारी द्यायची वेळ आली की बाहेरचा पै-पाहुणा शोधला जातो, अशी तीव्र भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. याच नाराजीतून अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडाळीचा प्रयत्न झाला आहे. काही ठिकाणी उमेदवार बदलण्यासठी दबावतंत्र वापरण्यात आले, तर काही ठिकाणी थेट अपक्ष उमेवारी दाखल करून नेतृत्वालाच आव्हान देण्यात आल्याचे पहायला मिळाले. जिल्हा परिषद गटात उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पंचायत समिती गणांमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गणांसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या 130 जागांसाठी अभूतपूर्व उमेदवारी अर्ज दाखल झाले, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
सातारा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी 95 तर 16 गणांसाठी 142 अर्ज दाखल झाले आहेत. अनेक तालुक्यांमध्ये बरेच मातब्बर नेते थेट मैदानात उतरल्याने येथील लढती अत्यंत कडव्या होण्याची चिन्हे आहेत. काही गटांत तर सत्ताधारी आणि विरोधकांसह बंडखोर उमेदवारांमुळे तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका बाजूला कार्यकर्त्यांचा रोष, दुसऱ्या बाजूला अपक्षांची फौज आणि तिसरीकडे विरोधकांची सेना अशा त्रिकोणी कोंडीत राजकीय पक्षांचे नेते अडकले आहेत. उमेदवार जाहीर करताना जिंकण्याची क्षमता हा निकष लावला जात असला तरी त्यातून पक्ष संघटनेत दीर्घकाळ नाराजी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकीट वाटपातील राजकारणात, कार्यकर्त्यांची नाराजी, अपक्षांची वाढती संख्या आणि मातब्बरांची थेट एंन्ट्री यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्याचे राजकारण अधिकच तापणार असून या निवडणुकीत नेमका कौल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.