Satara ZP Elections: उमेदवारीसाठी मातब्बरांच्या कोलांटउड्या

जिल्ह्यात विचित्र तडजोडी; गट व गणांमध्ये नाराजीचा विस्फोट : विचारधारा, नितिमत्तेला हरताळ
Local body elections
Satara ZP ElectionPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी अर्ज दाखल होण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर न करता थेट उमेदवारांनाच ए.बी. फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने काही ठिकाणी नाराजी नाट्य उफाळून आले.

पक्षाने उमेदवारी न दिल्याने काहींनी दुसऱ्या पक्षात उडी घेऊन उमेदवारीचा झेंडा फडकवला. कुठे फाटाफुट, तर कुठे उमेदवारीसाठी कोलांटउड्या घेतल्याचे चित्र दिसले. जिल्ह्यात विचित्र तडजोडी समोर आल्या असून पक्षीय विचारधारा व नितिमत्ता वेशीला टांगून राजकीय संकेतांनाही अनेकांनी हरताळ फासला आहे. भाजपने कोरेगाव तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे केले. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी फलटण वगळता अन्य तालुक्यांत एकत्रितपणे अर्ज भरले. शिवसेना शिंदे गटाने पाटण, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमध्ये जोर लावत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दरम्यान, आता अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसानंतर बंडाळीच्या वणव्याची धग कुणा कुणाला लागणार, हे स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या विचित्र आघाड्या, युत्या समोर येत आहेत. पुरोगामी म्हणवून घेणारेही काही पक्ष सत्तेतील पक्षासोबत गेले आहेत. भाजपने कोरेगाव वगळता सातारा, कराड, वाई, खंडाळा, खटाव, माण, पाटण, जावली, फलटण, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. फलटणमध्ये भाजपने मोजक्या जागा राष्ट्रवादीला सोडल्या आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने शरद पवार गटाला सोबत घेतले. त्यासोबत शिवसेनेचे दोन्ही गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (गवई गट) यांना सोबत घेऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला राबवला आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणुका लढणार आहे. कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाला जागा सोडण्यात आल्या आहेत. कराड दक्षिणमध्ये रेठरे बुद्रुक व कार्वे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवले जाणार आहेत. उर्वरित गटावर उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उभे केले आहेत.

शिवसेना शिंदे गटातर्फे फलटण, पाटण आणि कोरेगाव तालुक्यांसह काही मोजक्या ठिकाणी धनुष्यबाणावर उमेदवार उभे केले आहेत. भाजपमधील नाराजांना आपल्यासोबत घेऊन ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. माण, खटाव तालुक्यांमध्ये काही जागा पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. शिवसेना शिंदे गट कोरेगाव वगळता इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीसोबत आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे भाजप नेत्यांशी जुळवून घेण्यात यशस्वी झाले असून त्यांनी कोरेगाव तालुक्यातील उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे केले आहे. त्यांचे पारंपरिक विरोधक आ. शशिकांत शिंदे यांच्याविरोधात भाजपची रसद मिळवण्यात आ. महेश शिंदे यशस्वी झाले आहेत.

काँग्रेसने, शिवसेना उबाठा गट, वंचित आघाडीला सोबत घेत काही ठिकाणी जागा लढवल्या आहेत. निमसोड, वाठार किरोली, कुमठे गट व गणातील जागा काँग्रेसतर्फे लढवल्या जाणार आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातात. मात्र, या अलिखित परंपरेला यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी फाटा दिल्याचे चित्र पहायला मिळाले. मागील निवडणुकीमध्ये उमेदवारी याद्या जाहीर केल्यानंतर बंडखोरीचा वणवा एवढा पेटला की, त्या वणव्याची झळ राजकीय पक्षांच्या छावण्यांमध्ये दिसली होती, मागील अनुभव लक्षात घेता पक्षीय उमेदवारांच्या अधिकृत याद्या जाहीर न करताच पक्षनेत्यांनी इच्छुकांना फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिले.

गेली सात ते आठ वर्षे तयारी करणाऱ्या अनेकांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज न मिळाल्याने रुसा-रुसी, फुगा फुगीने अनेक ठिकाणच्या तंबूंमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले. तर हमरी-तुमरीने पक्षांच्या छावण्यांमध्ये कल्लोळ माजून फाटाफुटीचे वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पक्षामध्ये बंडाचे लोण सर्वाधिक आहे. इच्छुकांपुढे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तरी चालेल कुठलाही झेंडा आपण हाती घेवू, अशी भावना सर्रासपणे उमेदवारी व्यक्त करत आहेत. या वणव्याची झळ त्या-त्या राजकीय पक्षांना बसण्याची पार्श्वभूमीही ए. बी. फॉर्म दिल्यानंतर लगेचच तयार झाली. जिथे सक्षम उमेदवार होते तिथेही राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे फॉर्म्युले वापरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news