Satara ZP Elections: जिल्ह्यात 85 उमेदवारांच्या दांड्या गुल

आता लक्ष माघारीकडे : छाननीत गटातील 31 तर गणातील 54 अर्ज अवैध
Local body elections
Satara ZP ElectionPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीचे धूमशान आता निर्णायक टप्प्यावर येऊन धडकले आहे. गुरुवारी झालेल्या छाननीत 65 जिल्हा परिषद गटातील 31 तर 130 पंचायत समिती गणातील 54 अशा एकूण 85 उमेदवारांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. यामुळे प्रचारापूर्वीच निवडणूक लढवण्याचे त्यांचे मनसुबे उधळून गेले. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दि. 27 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. दरम्यान, आता कोण कोण माघार घेणार याची उत्सुकता असून प्रमुख पक्षांना बंडाळी रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

सर्वच तालुक्यातील प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयांमध्ये त्या त्या तालुक्यांची अर्ज छाननी प्रक्रिया झाली. त्यावेळी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्जावर उमेदवारांची स्वाक्षरी नसणे, सूचकाची सही नसणे, अनुमोदक नसणे, जातीचा दाखला न जोडणे, प्रतिज्ञापत्र न देणे यासह विविध कारणांमुळे या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तसेच अनेकांनी दोन-तीन पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनेकांना पक्षाने एबी फार्म न दिल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. काही ठिकाणी पक्षाच्या मुख्य उमेदवारांचेच अर्ज बाद झाल्याने पर्यायी उमेदवार देण्याची नामुष्की आली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच प्रमुख लढत होत असली तरीही शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, मित्र पक्ष तसेच स्थानिक आघाड्यांनी निवडणुकीत दंड थोपटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाले तरी बंडखोरी टाळण्यासाठी नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडखोरीचा सर्वच पक्षांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषद गटासाठी 632 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 130 पंचायत समिती गणासाठी 1 हजार 59 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी 85 जणांना निवडणूकीपूर्वीच गारद व्हावे लागले.

माण तालुक्यातील 5 गटांसाठी 40 तर 10 गणांसाठी 87 अर्ज आले होते. छानणी दरम्यान सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मात्र छाननी दरम्यान आंधळी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली जगदाळे यांच्या अर्जावर पल्लवी काळे यांनी प्रॉपर्टी लपवल्याचा आक्षेप घेतला होता. यावर सुनावणी होवून हा आक्षेप फेटाळण्यात आला. तसेच याच गटातील भाजपच्या सोनल गोरे यांनी प्रॉपर्टीची अपुरी माहिती दिल्याचा आक्षेप दिपाली जगदाळे यांनी घेतला होता. हाही आक्षेप फेटाळण्यात आला.

वाई तालुक्यातील 4 गट व 8 गणांसाठी 81 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अभेपूरी व बावधन गणातून प्रत्येकी एका अपक्षाचे अर्ज बाद झाले. सूचकाची सही नसणे व सूचकाच्या जागी उमेदवाराने सही केल्याने हे अर्ज बाद झाले. यामुळे आता 79 जणांचे अर्ज वैध ठरले. खंडाळा तालुक्यातील 3 गट व 6 गणांसाठी 122 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 30 जणांचे अर्ज अवैध ठरले. या छाननीत खेड बु ॥ पंचायत समिती गणातील भाजपाच्या उमेदवार सविता बापूराव धायगुडे यांचा अर्ज अवैध ठरल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. तर अनेकांनी पक्षांचे एबी फॉर्म न जोडताच अर्ज भरल्याने ते निवडणूक प्रक्रियेतून आऊट झाले. या तालुक्यात आता 92 अर्ज वैध ठरले आहे.

फलटण तालुक्यातील 8 गट व 16 गणांसाठी 183 अर्ज दाखल झाले होते. छाननीत तालुक्यातील कोळकी व सासवड गणातील प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. यामुळे 181 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सर्व अर्ज वैध ठरले. मात्र, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय मोरे यांच्या अर्जावर तिकीट न मिळालेल्या व अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या समीर चव्हाण या शिवसेना पदाधिकाऱ्याने मोरे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. यामुळे चांगलाच ड्रामा झाला.

कोरेगाव तालुक्यात 6 गट 12 गणांसाठी 147 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये गटातील 4 व गणातील 7 जणांचे अर्ज बाद झाले. गटातून गणेश पवार, शुभांगी देशमुख, ज्योती फाळके, समाधान गडगे यांचे तर गणातून राहुल धुमाळ, शुभांगी जाधव, महेंद्र मोरे, सरोज गंगावणे, सुनीता मोहिते, सुनील भोसले, मनीषा जंगम यांचे अर्ज बाद झाले. यामुळे आता 136 जण मैदानात राहिले आहेत. जावलीत 3 गट व 6 गणांसाठी 90 अर्ज आले होते. यामधील म्हसवे गटातील दोन, कुसुंबी गटातील एक व कुसुंबी गणातील एक असे चार अर्ज अवैध ठरले. यामुळे 86 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news