Local body elections
Satara ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळीPudhari Photo

Satara ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणधुमाळी

आज पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात ; जि.प.चे 12 गट व 24 गणांत निवडणुकीचे धुमशान
Published on

कराड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा प रिषदेचे 12 गट व पंचायत समितीचे 24 गणांसाठी निवडणूक होत आहे. 4 लाख 66 हजार 606 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांची उपस्थिती होती.

22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 ते 27 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे, गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे एकूण 12 गट व पंचायत समितीचे 24 गण असून एकूण 486 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

आचारसंहिता जाहीर झाल्यापासून प्रशासनाकडून व्यापक कारवाई सुरू असून शासकीय ठिकाणांवरील 517 तर सार्वजनिक ठिकाणांवरील 2,513 फलक, कोनशिला व झेंडे काढून टाकण्यात किंवा झाकून ठेवण्यात आले आहेत. खाजगी जागेवरील जाहिराती काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 33 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.मतदार यादी तपासणीमध्ये 14,497 दुबार मतदार आढळून आले असून त्यांच्याकडून परिशिष्ट ‌‘एक‌’ भरून घेण्यात येत आहे. अशा दुबार मतदारांच्या नावांवर विशेष शिक्के मारण्यात आले आहेत. तसेच 7,829 मयत मतदारांची नोंदही यादीतून वेगळी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 7 लाख 50 हजार रुपये तर पंचायत समिती सदस्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना 3 फेब्रुवारी रात्री बारापर्यंत प्रचार करण्याची परवानगी असेल.

पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, वारुंजी, सुपने, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले व येळगाव या 12 जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण 4 लाख 66 हजार 606 मतदार असून त्यामध्ये 2 लाख 6 हजार 459 पुरुष व 2 लाख 60 हजार 134 महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून शांततापूर्ण व पारदर्शक निवडणूक पार पाडण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news