Satara ZP Election : राष्ट्रवादी-सेनेची सत्तेकडे वाटचाल

भाजप नं. 1, पण स्वबळाचे स्वप्न भंगले; बलाढ्य गड ढासळले
Satara ZP Election
Satara ZP Election
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये एकहाती सत्ता आणण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाटाघाटी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेनेला 15, काँग्रेसला 1 तर अपक्षांना दोन जागा मिळाल्याने बहुमताला आवश्यक असणाऱ्या 33 जागा कोणत्याही एका पक्षाला न मिळवता आल्याने सत्तेचे त्रांगडे झाले आहे. भाजपचे बलाढ्य गड ढासळल्याने निवडणूक पूर्व एकत्र असलेले दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना काँग्रेस व अपक्षांचीही साथ मिळणार आहे. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी सरसावलेल्या भाजपच्या नेतेमंडळींच्या पदरात निराशा पडली आहे, तर जिल्हा परिषदेत शिवसेनेला सोबत घेऊन पुन्हा घड्याळाचा गजर करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर एकहाती कमळ फुलवण्याचा विडा उचलत या निवडणुकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यूहरचना आखली होती. भाजपने बेदखल केल्याने राष्ट्रवादी, शिवसेनेनेदेखील संघर्षाचे शिंग फुंकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. नितीन पाटील, विधानसभेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी डाव टाकले. हे डाव या निवडणुकीत यशस्वी ठरून भाजपचे इरादे रोखण्यामध्ये या नेत्यांना यश आले आहे.

राज्यभर भाजपचा माहोल असताना सातारा जिल्हा परिषदेच्या 65 पैकी 27 जागांवर भाजपला विजय मिळवता आला. सत्ता स्थापनेसाठी 33 जागांची गरज असल्याने भाजपला भिडू शोधावा लागणार असून एकहाती सत्ता मिळवण्याचे भाजप नेत्यांनी पाहिलेले स्वप्न धुळीला मिळाले आहे. सातारा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांपैकी लिंब, कोडोली, कारी, शेंद्रे, नागठाणे या पाच गटांवर भाजपचे कमळ फुलले. तर पाटखळ, खेड या गटांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. वर्णे गटात स्वाभिमानी पक्षाने बाजी मारली. पाटखळ, लिंब, कोंडवे, संभाजीनगर, परळी, कारी, निनाम, शेंद्रे, अतित, अपशिंगे या 10 गणांवर कब्जा मिळवत भाजपने सातारा पंचायत समितीची सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीने शिवथर, खेड,क्षेत्रमाहुली, कोडोली, वर्णे या पाच गणांमध्ये विजय मिळवला. शिवसेनेने नागठाणे गणामध्ये एक जागा पटकावली. मात्र सातारा तालुक्यात खा.उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे यांच्या एकत्रित हुकमतीला राष्ट्रवादी काँग्रेसने शह देत एका पुरस्कृत जागेसह तीन गटात तर पाच गणांमध्ये विजय मिळवले.

फलटणमध्ये गटाच्या 8 जागांपैकी 5 जागांवर शिवसेना रामराजे गटाने विजय मिळवला. भाजपला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. तरडगाव, साखरवाडी, विडणी, बरड, कोळकी गटांत शिवसेनेने विजय मिळवला. हिंगणगाव, वाठार निंबाळकर या दोन गटात भाजपने विजय मिळवला तर राष्ट्रवादीने गुणवरे या एका गटात विजय मिळवला. पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवून शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेला पाडेगाव, तरडगाव, सस्तेवाडी, सांगवी, बरड, दुधेबावी, सासवड, जाधववाडी हे आठ गण शिवसेनेला मिळाले. भाजपने हिंगणगाव, सुरवडी, वाठार निंबाळकर, कोळकी, विडणी या 5 गणांमध्ये भाजपने विजय मिळवला. तर राष्ट्रवादीने साखरवाडी, गुणवरे, आसू या गणांत विजय मिळवला.

महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रत्येकी 1 गट राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाला मिळाला आहे. तळदेव गटात शिवसेनेने विजय मिळवला तर भिलार गटामध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला. पंचायत समितीच्या कुंभरोशी, तळदेव या गणांमध्ये शिवसेना तर भिलार व मेटगुताड या गणांमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला. महाबळेश्वरच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या एकतर्फी सत्तेला शिवसेनेने चेक दिला आहे. महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ, भादे या 2 गटांवर राष्ट्रवादीने कब्जा मिळवला तर खेड बुद्रूक हा गट भाजपकडे गेला. शिरवळ, नायगाव, भादे, खेड बुद्रुक या 4 गणांत विजय मिळवत राष्ट्रवादीने पंचायत समितीत सत्ता आणली. बावडा व पळशी या दोन गणांंमध्ये भाजपने विजय मिळवला.

जावली तालुक्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सत्तेला राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी हादरा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. शशिकांत शिंदे यांनी एकत्र येवून जावलीत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. जावलीतील तीनपैकी म्हसवे, कुडाळ या गटांवर भाजपने झेंडा फडकावला. तर कुसुंबी गटामध्ये शिंदेसेना सरस ठरली आहे. पंचायत समितीच्या कुडाळ, सायगाव, खर्शी बारामुरे या गणांवर भाजपने विजय मिळवला. तर कुसुंबी, आंबेघर तर्फ मेढा या गणांवर शिवसेनेने व म्हसवे गणात राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजय मिळवला. मेढा पंचायत समितीमध्ये देखील सत्तेचे त्रांगडे होऊन बसले आहे.

माण तालुक्यातील 5 गणांपैकी आंधळी, बिदाल या गटांवर भाजपने विजय मिळवला असला तरी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या तालुक्यात राष्ट्रवादीने कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, मार्डी हे तीन गट काबीज केले. मलवडी, आंधळी, बिदाल, वावरहिरे, पळशी, वरकुटे- मलवडी, कुकुडवाड, गोंदवले बुद्रूक, वरकुटे म्हसवड, मार्डी या पाच गटांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी माण पंचायत समितीमध्ये संघर्ष उफाळणार आहे.

खटाव तालुक्यातील खटाव, कातरखटाव, पुसेसावळी, मायणी या गटांवर भाजपने वर्चस्व मिळवले. तर राष्ट्रवादीने बुध व औंध या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राखीव असलेल्या गटासह निमसोड गटावर वर्चस्व मिळवले. डिस्कळ, खटाव, दरुज, कातरखटाव, निमसोड, म्हासुर्णे, मायणी व कलेढोण अशा 8 गणांवर कब्जा मिळवत पंचायत समितीची सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा बुध, पुसेगाव, गुरसाळे, सिध्देश्वर कुरोली, औंध व पुसेसावळी या सहा गणांमध्ये गजर झाला.

कोरेगावमध्ये 6 जिल्हा परिषद गटांपैकी एका गटावर भाजपला विजय मिळवता आला. पिंपोडे बुद्रुक गटात भाजपने एकमेव विजय मिळवला. तर राष्ट्रवादीने वाठार स्टेशन, वाठार किरोली, एकंबे गटामध्ये विजय मिळवला. शिवसेना सातारारोड व कुमठे या दोन गटांमध्ये विजयी झाली. सर्वाधिक 9 गणांमध्ये विजय मिळवत कोरेगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. सोनके, पिंपोडे, सातारारोड, कुमठे, ल्हासुर्णे, एकंबे, साप, आर्वी, वाठार किरोली या 9 गणांमध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. या तालुक्यामध्ये खा. नितीन पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावून भाजप-शिवसेनेला रोखून आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाला शह दिला. शिवसेनेने अंबवडे संमत वाघोली व किन्हई या गणांत विजय मिळवला तर भाजपला वाठार स्टेशन गणावर समाधान मानावे लागले.

कराड तालुक्यातील 12 गटांपैकी 8 गटांवर भाजपने विजय मिळवला. पाल, उंब्रज, मसूर, सैदापूर, तांबवे, विंग, रेठरे बुद्रूक, काले या गटांमध्ये भाजपने शिरकाव केला. तर कार्वे व येळगाव गटामध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला. कोपर्डे हवेली गटात अपक्षाने बाजी मारली तर काँग्रेसने वारुंजी गटात आपले स्थान राखले आहे. 24 गणांपैकी चरेगाव, मसूर, वडोली भि., सैदापूर, हजारमाची, कोयना वसाहत, विंग, कोळे, गोळेश्वर, रेठरे बुद्रूक, शेरे, काले गणांंमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले तर येळगाव, सवादे, कालवडे, कार्वे, उंब्रज, पाल या गणांमध्ये राष्ट्रवादीने यश मिळवले. काँग्रेसने तळबीड, वारुंजी गण ताब्यात ठेवले.

पाटण तालुक्यामध्ये म्हावशी गट व म्हावशी गणाचा अपवाद वगळता शिवसेनेने भाजपला व्हाईट वॉश दिला. शिवसेनेने गोकुळ तर्फ हेळवाक, तारळे, मल्हारपेठ, मारुल हवेली, मंद्रुळकोळे, काळगाव या गटांमध्ये शिवसेनेने भगवा फडकावला. तसेच गोकुळ तर्फ हेळवाक, येराड, मुरुड, तारळे, चाफळ, मल्हारपेठ, नाडे, मारुल हवेली, नाटोशी, मंद्रुळकोळे, सणबूर, काळगाव, धामणी या 13 गणांवर विजय मिळवत पाटण पंचायत समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news