सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे धूमशान निर्णायक टप्प्यावर आले आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे एबी फॉर्म अद्यापही उमेदवारांपर्यंत पोहोचलेले नसून युती व आघाड्यांचा सिलसिला मंगळवारीही सुरूच राहिला. भाजपविरोधात जिल्ह्यात आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने आपली स्वतंत्र बैठक घेतली, तर शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी यांनीही आपले पत्ते ओपन केले नाहीत. चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? हा सस्पेन्स कायमच राहिला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा अखेरचा दिवस असल्याने उद्या अर्ज भरण्यासाठी हायहोल्टेज ड्रामा रंगणार आहे.
भाजपतर्फे मंगळवारी येथील एका हॉटेलवर बैठक घेतली. ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. बैठकीला खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, सत्यजित पाटणकर, सुनिल काटकर, राजू भोसले, डॉ. प्रियाताई शिंदे, चिन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. निवडणुकीसाठी 996 उमेदवार इच्छुक आहेत, त्यामध्ूान 65 उमेदवार जिल्हा परिषदेला तर 130 उमेदवार पंचायत समितीसाठी निवडायचे आहेत. त्यामुळे उमेदवारी वाटप करताना काळजी घ्यावी लागणार आहे. एका जागेवर त्याच परिसरातील दुसरा ताकदीचा उमेदवार इच्छुक आहे, अशा परिस्थितीमध्ये क्लॅशेस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे मातब्बर इच्छुक आहेत, पण त्यांना उमेदवारी नाकारली तरी त्यांची इतर ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. जिल्हा नियोजन समिती, महामंडळे, विविध शासकीय कमिट्या हा पर्याय इच्छुकांपुढे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीवेळी इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली होती. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत उमेदवारांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय हा प्रिमॅच्युअर होईल, अशी सर्वच पक्षांच्या नेत्यांचे मत आहे. उमेदवारी जाहीर केल्यास बंडखोरी उफाळू शकते. त्यामुळे या गोष्टीला लगाम घालण्यासाठी उमेदवारी यादी जाहीर न करता बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप करण्याचा निर्णय सर्वच पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार द्विधा मन:स्थितीत आहेत. अर्ज भरला असला तरी एबी फॉर्म मिळाला नाही तर करायचे काय? याच्या विवंचनेत ते सापडले आहेत. अंतिम क्षणी पक्षाने डावलल्यास बंडखोरी करायची का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान, एबी फॉर्म न मिळालेल्या मात्र अर्ज दाखल केलेल्या पक्षाच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी आता प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी करावी लागणार आहे.
जिल्हा कमिटी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत ठरलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील जागांनुसार तालुका पदाधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म पाठवण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजपने मंगळवारी बैठक घेवून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ कायम होते. भाजपमधील नाराजांनाही संधी देण्याची या पक्षांची व्यूहरचना आहे.
दरम्यान, साताऱ्यात पार पडलेल्या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्रकारांनी सातारा तालुक्यातील जागा वाटपाबाबत काय ठरले आहे? उदयनराजेंना किती आणि तुमचे उमेदवार किती असणार? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आमच्याकडे सर्वच उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत. सर्वच जागा भाजपच्या असल्याने जागा वाटपाचा विषयच येत नसल्याचे स्पष्ट केले.