

सातारा : सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 11 पंचायत समितींसाठी शनिवारी मतदानावेळी काही ठिकाणी राडेबाजी, तर काही ठिकाणी हमरीतुमरी, वादावादीच्या घटना घडल्या. जागोजागी राजकीय खुन्नस उफाळल्याचेही चित्र पाहायला मिळाले. सातारा तालुक्यातील पाटखळ व कृष्णानगर केंद्रांवर कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे बोगस मतदान करण्याचा प्रकार झाल्याने राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन राजकीय खुन्नस चव्हाट्यावर आली. या तीनही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. हाणामारीच्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले. काही ठिकाणी यंत्रात बिघाड झाल्याने मशिनच बदलावे लागले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी व पंचायत समितीच्या 130 गणांसाठी सुमारे 65 टक्क्यांवर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या 231, तर पंचायत समितीच्या 395 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले.
तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. निवडणुकीसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 2 हजार 877 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी जागोजागी रांगा लागल्या होत्या. तरुण मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता. फलटण, कराड व महाबळेश्वर तालुक्यांत नवविवाहितांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी वयाची शंभरी पार केलेल्या वृद्धांनीदेखील उत्साहाने मतदान केले. दुपारी मात्र मतदान संथगतीने झाले. दुपारी साडेतीनपर्यंत 11 लाख 19 हजार 461 मतदारांनी मतदान केले होते. यावेळेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 51.02 टक्के इतके मतदान झाले होते. महाबळेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक 58.36 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. जे मतदार साडेपाचपर्यंत मतदान केंद्रावर आले, त्यांना निवडणूक आयोगातर्फे मतदान करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरूच राहिले.
दरम्यान, निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच शनिवारी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमधील हमरी तुमरी, राजकीय खुमखुमी, बोगस मतदानाच्या तक्रारी व आक्षेप असे प्रकार ठिकठिकाणी घडले. पाटखळ येथे बोगस मतदार आढळून आल्याने शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे देखील एक बोगस मतदार आढळून आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. वयोवृध्दांना मतदान केंद्रामध्ये नेण्याची प्रक्रिया सुरु होती. भाजपचे कार्यकर्ते त्यांना घेवून कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, बोगस मतदानाबाबत कोणावरही रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
खेड जिल्हा परिषद गटासाठी मतदान सुरु असताना भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महाबळेश्वर तालुक्यातील दानवली येथे मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरामध्ये डमी मतदान मशीन आढळून आले. हे मशिन प्रशासनाने जप्त केले. फलटण तालुक्यातील ढवळ येथील मतदान केंद्रावर बंद पडलेले मशीन बदलावे लागले. याचबरोबर कोरेगाव तालुक्यातही 6 मशिन्स बदलण्याची वेळ प्रशासनावर आली.
सातारा, माण, फलटण, पाटण, कराड या तालुक्यांतील काही मतदान केंद्रे अत्यंत संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर पोलिसांचा खडा पहारा होता. तसेच या केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत होते. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रावर अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान चुरशीने व नेटाने झाल्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.