Satara ZP Election : झेडपी निवडणूक प्रचारात एआय तंत्रज्ञान ठरले सुपरहिट

विरोधी उमेदवारांवर वर्मी घातला घाव : मतदारांच्या मनाचाही घेतला ठाव
Satara ZP News
सातारा जिल्हा परिषदpudhari photo
Published on
Updated on

अविनाश कदम

खटाव : काल पार पडलेली जिल्हा परिषदेची निवडणूक अनेक अर्थाने हटके ठरली. या निवडणुकीत प्रचाराचे पारंपरिक आणि नवनवीन अत्याधुनिक फंडे वापरण्यात आले. खास करून या निवडणूक प्रचारात एआय तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता) खूपच प्रभावी ठरले. एआयद्वारे केलेल्या प्रचाराने विरोधकांच्यावर वर्मी घाव घालण्यात आले, तर याच तंत्रज्ञानाने मतदारांच्या मनाचा ठावही घेतला.

प्रत्येकवेळी निवडणूक प्रचारात नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जातात. पूर्वी भिंतींवर रंगाने निवडणूक चिन्ह चित्रे रेखाटली जायची आणि स्लोगन्स लिहिल्या जायच्या. आता त्याची जागा आकर्षक फ्लेक्स बोर्डसनी घेतली आहे. पूर्वी गाडीत स्पिकर आणि माईक घेऊन तोंडाने जोरजोरात प्रचार केला जायचा. ताई, माई, आक्का अमूक तमूक चिन्हावर मारा शिक्का हे परवलीचे वाक्य हमखास कानावर पडायचे. आता डिजिटल साऊंड स्टुडिओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन नवीन जुन्या गाण्यांच्या चालीवर प्रचारगीते तयार केली जात आहेत. उमेदवार आणि पक्षाने केलेली विकासकामे बुकलेट्स आणि डॉक्युमेंटरीद्वारे अत्यंत प्रभावीपणे मतदारांसमोर मांडण्यात येत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईलवर प्रचाराच्या रिल्स धुमाकूळ घालताना दिसल्या. रेकॉर्डेड व्हाईस कॉल्स करुन मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. घरोघरी डमी ईव्हीएम मशीन नेऊन मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत खरी रंगत एआय तंत्रज्ञानाने आणली. विरोधकांच्या गोटातील उमेदवारासह बगलबच्च्यांची हुबेहूब पात्रे तयार करुन पाहिजे ते चांगले, वाईट आणि बदनामी करणारे प्रसंग चलचित्रफितीच्या स्वरुपात तयार करण्यात आले. त्यात विरोधकांनी केलेला भ्रष्टाचार, गोलमाल, दिलेली फसवी आश्वासने प्रभावीपणे दाखवण्यात आली. कुणी कुणाला कसा आणि कुठे धोका दिला, कुणी विश्वासघात केला, कुणी शब्द फिरवला, कुणी कोणत्या कामात कसा आणि किती पैसा खाल्ला असे अनेक प्रसंग एआय तंत्रज्ञानाने मतदारांसमोर आणले गेले. आपलाच उमेदवार कसा सर्वार्थाने निवडणुकीत लायक आहे, हे दाखवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला. या निवडणुकीत एआय तंत्रज्ञानाने मतदारांच्या मनाचा ठाव घेतानाच विरोधकांच्यावर वर्मी घाव घातल्याचेही पहायला मिळाले. या निवडणुकीत हायटेक प्रचाराची पातळी घसरल्याचेही पहायला मिळाले. भविष्यात प्रचाराचे यापेक्षा वेगळे आणखी अत्याधुनिक फंडे वापरले जाणार आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना घरोघरी उंबरे झिजवावे लागणार नाहीत. अगदी मतदारांच्या समोर बसून उमेदवार आपली भूमिका मांडू शकतील, असे तंत्रज्ञान लवकरच वापरात येणार आहे. अगदी जाहीर सभाही एआय तंत्रज्ञानाने आयोजित करता येणार असल्याने यापुढील निवडणुका आणखी हायटेक होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news