

सातारा : जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पेन्शन प्रदान करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद म्हणून सातारा जिल्हा परिषदेने नवा आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन वितरण प्रक्रियेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. महाआयटीच्या प्रणालीद्वारे कोषागारामार्फत निवृत्तीवेतन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवृत्तीवेतन वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम झाली आहे. महाआयटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर निवृत्तीवेतन जमा करण्याची व्यवस्था ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
या प्रणालीच्या प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणीसाठी सातारा जिल्हा परिषदेची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानुसार महाआयटीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन कोषागारामार्फत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी आधुनिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली.
या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक माहिती, अभिलेख व निवृत्तीवेतनविषयक तपशील संकलित करून तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. त्याचा थेट परिणाम म्हणून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे निवृत्तीवेतन निवृत्तीवेतन धारकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना कार्यालयीन प्रक्रियेसाठी अनावश्यक पाठपुरावा करण्याची गरज कमी झाली आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील तसेच सर्व पंचायत समित्यांच्या अर्थ शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, अचूक माहिती संकलन, तांत्रिक समन्वय व प्रशासकीय कार्यवाही करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. सातारा जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ही सुविधा जिल्हा परिषदेच्या डिजिटल आणि पारदर्शक प्रशासनाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे,उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले. अर्थ व शिक्षण समिती सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.